इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथा सामना भारतासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. मालिकेत १-२ ने पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाला आता दुखापतींचा डोंगर सामना सुरु होण्यापूर्वीच पार करावा लागणार आहे. मँचेस्टर कसोटीत चार महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे संघात काही नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याचे संकेत आहेत.
ऋषभ पंत, नीतीश रेड्डी, अर्शदीप सिंह आणि आकाश दीप हे चार खेळाडू सध्या दुखापतीच्या समस्यांनी त्रस्त आहेत. नीतीश रेड्डी आधीच संपूर्ण मालिकेबाहेर गेला आहे. अर्शदीप आणि आकाश दीप हे मँचेस्टर कसोटीत खेळणार नसल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. ऋषभ पंतबाबत अद्याप स्पष्टता नाही, मात्र तो फिट झाला, तर त्याच्या पुनरागमनाची शक्यता आहे. अन्यथा ध्रुव जुरेलला विकेटकीपर म्हणून संधी मिळू शकते.
संघाच्या फलंदाजी विभागात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल हे सलामीला येणार असून, करुण नायर आणि कर्णधार शुभमन गिल हे मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरतील. ऋषभ पंतची अनुपस्थिती असेल, तर मिडल ऑर्डरमध्ये ध्रुव जुरेलची उपस्थिती दिसू शकते.
ऑलराउंडर म्हणून रवींद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदर यांची निवड निश्चित वाटते. नीतीश रेड्डीच्या जागी अंशुल कंबोज या नवख्या खेळाडूला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कसोटी खेळण्याची संधी मिळू शकते. अंशुलने घरगुती क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असून, २४ प्रथम श्रेणी सामन्यांत ४८६ धावा आणि ७९ विकेट्स घेतल्या आहेत.
गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे मुख्य भिस्त असतील. आकाश दीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
दुखापतींच्या झटक्यांमुळे टीम इंडियासमोर चौथ्या कसोटीत मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. मात्र नव्या चेहऱ्यांच्या संधींच्या पार्श्वभूमीवर ही कसोटी टीम इंडियासाठी पुनरागमनाचं व्यासपीठ ठरू शकते. २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या या सामन्यात भारताला विजय मिळवणे आवश्यक आहे, अन्यथा मालिकेत पराभव निश्चित मानावा लागेल.