आंबेगावातील बाबाजी पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी सकाळी भरदिवसा एका उद्योजकाला मारहाण करून तीन अज्ञात इसमांनी ४० लाख रुपयांची रोकड भरलेली बॅग लंपास केली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अज्ञात आरोपींविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावचे रहिवासी अभिजित विष्णू पवार (३२) हे त्यांच्या मंगेश धोंडे या मित्रासह व्यवसायासाठी पुण्यात आले होते. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी बाबाजी पेट्रोल पंपासमोरील एका इमारतीजवळ गाडी पार्क केली होती. व्यवसाय संबंधित व्यवहार झाल्यानंतर ते दोघे रोकड भरलेली बॅग घेऊन परत गाडीकडे येत असताना हा प्रकार घडला.
तेवढ्यात एका काळ्या SUV गाडीतून तीन अज्ञात व्यक्ती घटनास्थळी आले. त्यांनी मंगेश धोंडे यांच्या खांद्यावर असलेली बॅग जोरात ओढून घेतली. अभिजित पवार यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना मारहाण करण्यात आली आणि आरोपींनी गाडी घेऊन पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. “पवार हे बांधकाम साहित्य पुरवठा व्यवसायात असून, व्यवसायिक व्यवहारासाठी पुण्यात आले होते,” असे मोहिते यांनी सांगितले.
आंबेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(6) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अंभेगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन चोरमाळे यांनी सांगितले की, “प्राथमिक तपासात आरोपींनी आधीच रेकी केली असावी आणि संधी साधून रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून नेली.”
पोलीसांनी तपासासाठी विशेष पथके तयार केली असून, घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. आरोपी लवकरच गजाआड केले जातील, असे पोलीसांचे म्हणणे आहे.











