एरंडवणे येथील सह्याद्री रुग्णालय चालवणाऱ्या कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला पुणे महापालिकेने बुधवारी नोटीस बजावली आहे. रुग्णालयाच्या जागेच्या लीज अटींबाबत तसेच मणिपाल हॉस्पिटल्स ग्रुपकडे झालेल्या कथित हस्तांतराबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. याआधी मंगळवारी मणिपाल ग्रुपने सुमारे ₹6,400 कोटींना सह्याद्री रुग्णालयाचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली होती.
ही जमीन २७ फेब्रुवारी १९९८ रोजी ९९ वर्षांसाठी ट्रस्टला लीजवर देण्यात आली होती. या करारात जमीन केवळ रुग्णालय उभारण्यासाठी वापरण्याची अट असून, वार्षिक भाडे फक्त ₹१ निश्चित करण्यात आले होते. यासाठी ट्रस्टकडून ₹५३.३५ लाखांचे प्रीमियमही PMC ला भरले गेले होते. मात्र या करारातील अटींनुसार, कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण, सबलीज किंवा आर्थिक नियंत्रण इतर कोणत्याही गटाकडे दिल्यास त्यासाठी महापालिका आयुक्तांची पूर्व लेखी परवानगी आवश्यक आहे.
महापालिकेच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, कराराच्या अटींचे उल्लंघन होत असल्याचा प्राथमिक संशय आहे. त्यामुळे कोकण ट्रस्टने सह्याद्री रुग्णालय किंवा मणिपाल ग्रुपसोबत केलेले सर्व करार, जमिनीवर कुठलेही कर्ज किंवा तारण घेतले असल्यास त्यासंबंधीची माहिती, तसेच सर्व कागदपत्रे PMC कडे सात दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
PMC च्या मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वसुधारा बर्वे यांनी सांगितले की, “कोकण ट्रस्टकडून सात दिवसांत संपूर्ण खुलासा अपेक्षित आहे. या जमिनीचा उपयोग आणि हस्तांतराच्या अटी तपासून पुढील कारवाई केली जाईल.”
या नोटीसनंतर कोकण मित्र मंडळ ट्रस्टने प्रतिक्रिया देताना म्हटले की, “PMC च्या नोटीशीनुसार आम्ही सात दिवसांत आवश्यक कागदपत्रांसह आमचे उत्तर सादर करू.”
PMC कडून ही कार्यवाही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुरु करण्यात आली असून, यामुळे शहरातील इतर लीजवर दिलेल्या संस्थांवरही नवीन नियमावली लागू होण्याची शक्यता आहे.