समीप पंढरीचा आनंद… गगनभेदी टाळ-मृदंग गजर चिखलात रंगला भक्तीचा सोहळा… रिंगणाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले

0
3

पंढरी समीपचा आनंद… गगनभेदी टाळ-मृदंग गजर… दाटून आलेले ढग… ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष आणि पाद्यस्पर्शी चिखलात देहभान विसरून नाचणारे वारकरी, अशा भक्तिरसात ओथंबलेल्या वातावरणात वाखरीजवळ उभ्या आणि गोल रिंगणात अश्वांनी दौड मारत लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. वाखरीत सकल संतांची मांदियाळी मुक्कामी आहे. भंडीशेगाव येथील तळावर पहाटे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी महापूजा केली. त्यानंतर कांदेनवमी असल्याने तळांवर कांदेभज्यांची न्याहरी झाली. दुपारचे जेवण करून सोहळा एक वाजता पालखी सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. निघाल्यापासूनच उन्हाची तिरीप होती. भंडीशेगाव ओलांडल्यानंतर ढगांनी आभाळ भरून गेल्याने उकाडा वाढला. वारकरी घामाघूम झाले होते मात्र, हरिनामाने त्यांच्या पायाला बळ मिळत होते. तीनच्या सुमारास माउलींचा पालखी सोहळा वाखरीजवळ उभ्या रिंगणासाठी थांबला. मधोमध पालखी रथ थांबला. लगेचच दिंड्यांमधून रिंगण लावण्यात आले.

भोपळे दिंडीचा मानकरी धावत निघताच रिंगणाला प्रारंभ झाला. २७ नंबर दिंडीपासून अश्व धावत रथाकडे निघाले. त्यावेळी ‘माउली माउली’चा जयघोष शिगेला पोचला. अश्व रथाच्या डाव्या बाजूने मागे काही दिंड्यांमध्ये गेला. तेथून परत फिरून रथातील पालखीजवळ आले, त्यानंतर त्यांना विश्वस्तांनी हार घातला. प्रसाद दिला. तेथून दोन्ही अश्व धावत पुढे २७ दिंडीपर्यंत गेला. उभ्या रिंगणानंतर पालखी सोहळा चार वाजता गोल रिंगणात पोचला. गोलाकार दिंड्या रिंगणात जाऊ लागल्या. सव्वाचारला पालखी गोलाकार फिरून रिंगणात मधोमध आली. त्यानंतर पालखीजवळ पताकाधारींची दाटी झाली.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

त्यानंतर लावलेल्या रिंगणातून भोपळे दिंडी मानकऱ्यांनी पताका घेऊन दोन फेऱ्या मारल्या. त्यानंतर दोन्ही अश्व रिंगणात धावू लागले. दोन्ही अश्वांनी वेगात तीन फेऱ्या पूर्ण केल्या. या वेळी उपस्थित लाखो भाविकांच्या मुखातून माउली माउलीचा जयघोष झाला. त्यानंतर उडीचा खेळ रंगला.पावसामुळे रिंगणाच्या जागेमध्ये चिखल झाला होता. त्यात वारकरी बेभान झाले होते. दिंड्यांमध्येही वारकरी खेळ खेळत होते. यावेळी आमदार नीतेश राणे यांनी रिंगणाला भेट दिली. माउलींचा गोल रिंगणाचा सोहळा पाहण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील मोठ्या संख्येने भाविक वाखरीत आल्यामुळे सर्व संतांच्या सोहळ्यातील वारकरी आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीने संतांचे वैभव पाहायला मिळाले. जिकडे पाहावे तिकडे वारकरीच दिसत होते.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

वाखरीत जमला वैष्णवांचा मेळा

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव यांसह अनेक संतांच्या पालख्यांचा आज वाखरीत मुक्काम आहे. त्यामुळे वाखरीला पंढरीचे रूप आले होते. वाखरीत एकाच ठिकाणी सकल संतांचे दर्शन होत असल्याने परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. उद्या या सर्व पालख्या पंढरीत प्रवेश करणार आहे. एकादशीला आपली वारी पांडुरंगाच्या चरणी रुजू करणार आहेत.

श्री विठ्ठल दर्शन रांगेत ६० हजार भाविक

पंढरपूर, ता. ४ ः आषाढी वारीच्या निमित्ताने सावळ्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीने वारकरी पंढरीत दाखल होऊ लागले आहेत. अनेक संतांच्या पालख्या आज पंढरीत दाखल झाल्या आहेत. तर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उद्या (ता. ५) पंढरीत विसावणार आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी अवघे काही तास उरले असतानाच पंढरीत लाखो भाविकांनी गर्दी आहे. शुक्रवारी रात्री सुमारे पाच लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शन रांगेत सुमारे ६० हजार भाविक उभे आहेत. विठ्ठल दर्शनासाठी १० ते ११ तास लागत आहेत.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

रविवारी आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे १८ ते २० लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. त्या दृष्टीने यंदा प्रशासनाने आषाढी वारीचे नियोजन केले आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारीच्या तयारीची पाहणी केली.