राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत आयोजित केलेल्या परीक्षेत त्रुटी असल्याची कबुली राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या प्रकरणी संबंधित विषयतज्ज्ञांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधिमंडळ अधिवेशनात लोकप्रतिनिधींकडून विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री पाटील यांनी ही माहिती दिली.
परीक्षा केंद्राकडे तक्रार केली; पण दखल घेतली गेली नाही –
ते म्हणाले, ‘राज्य एमएचटी-सीईटी परीक्षेत चालू वर्षी चार मे रोजी घेतलेल्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील २१ प्रश्न चुकीचे होते. त्यामुळे परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय झाला. विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर ५० गुणांच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील सुमारे २० ते २५ प्रश्नांत चारही पर्याय चुकीचे होते. याबाबत त्यांनी परीक्षा केंद्राकडे तक्रार केली; पण दखल घेतली गेली नाही, ही बाब खरी आहे.’
२७ हजार उमेदवरांची उपस्थिती –
एमएचटी-सीईटी २०२५ ही सामाईक प्रवेश परीक्षा पीसीबी आणि सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत २८ हजार ८३७विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या पीसीएम ग्रुपकरिता चालू वर्षी नऊ ते २७ एप्रिल या कालावधीत एकूण २८ सत्रात पार पडली आहे. या २८ सत्रांपैकी २७ एप्रिल रोजीच्या सकाळच्या सत्रात इंग्रजी, मराठी आणि उर्दू भाषांतील पीसीएम ग्रुपच्या परीक्षेदरम्यान २७ हजार ८३७ उमेदवार उपस्थित होते.
२१ प्रश्नांत चुका –
या उमेदवारांना गणित विषयाशी संबंधित इंग्लिश भाषांतरातील २१ प्रश्नांत चुका असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. मराठी आणि उर्दू प्रश्नांमध्ये चूक नव्हती. इंग्लिश भाषांतरामध्ये चुका आढळल्याने ज्या उमेदवारांनी सकाळी ही परीक्षा दिली, त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी चालू वर्षी पाच मे रोजी फेरपरीक्षा घेतली. या प्रकरणी संबंधित विषयतज्ज्ञांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे, असेही पाटील यांनी सांगितले.