मुंबई दि. २७ (रामदास धो. गमरे) भारतातील ऋषीतुल्य पहिला राजा आरक्षणाचे जनक ज्याने सन १९०२ साली सरकारी नोकऱ्यांत मागासवर्गीय वर्गाला ५०% आरक्षण दिले, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून दलित मुलांसाठी १९१३ साली खेड्यापाड्यात शाळा सुरू केला समाजातील अस्पृश्यता व जातिभेदाची भिंत पाडण्यासाठी सवर्ण व दलित, अस्पृश्य विद्यार्थ्यांना १९१९ साली एकत्र शिक्षण देण्यास सुरुवात करणाऱ्या, मोफत पण सक्तीचे शिक्षण सुरू करणाऱ्या व आपल्या पाल्यांना शिक्षण घेऊ न दिल्यास पालकांना १ रुपया दंड ठोठावणाऱ्या महान राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती महोत्सव बौद्धजन पंचायत समिती मध्यवर्ती कार्यालय यांच्या विद्यमाने कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहू महाराजांच्या प्रतिमेला लक्ष्मण भगत यांनी पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित केली तर अतिरिक्त चिटणीस विठ्ठल जाधव गुरुजींनी आपल्या गोड व रसाळवाणीने धार्मिक पूजापठण केले तर सरचिटणीस राजेश घाडगे यांनी आपल्या पहाडी व प्रभावी आवाजात सूत्रसंचालन व प्रस्ताविक केले, प्रस्ताविक सादर करत असताना “सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांसाठी अस्पृश्यांच्या चळवळीचे क्षितिज विस्तारण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न करणाऱ्या मोजक्या समाजसुधारकांपैकी एक म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज होत” असे गौरवोद्गार काढले.
अध्यक्षीय भाषणात शाहू महाराजांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकत असता लक्ष्मण भगत यांनी “श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या प्रजेमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी अनेक शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले. पांचाळ, देवज्ञान, नाभिक, शिंपी, ढोर-चंभार समाज तसेच मुस्लिम, जैन आणि ख्रिश्चन अशा विविध जाती-धर्मांसाठी त्यांनी स्वतंत्र वस्तीगृहे स्थापन केली. विद्यार्थ्यांकरता मोफत वस्तीगृहे स्थापन केल्याने कोल्हापूर राज्य वस्तीगृहाची जननी म्हणून ओळखले जाऊ लागले, समाजातील सामाजिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांसाठी त्यांनी मिस क्लार्क बोर्डिंग स्कूलची स्थापना केली. मागासवर्गीय गरीब पण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक शिष्यवृत्ती सुरू केल्या. रूढी परंपरांना छेद देत त्यांनी वैदिक शाळांची स्थापना केली ज्यामुळे सर्व जाती आणि वर्गातील विद्यार्थ्यांना धर्मग्रंथ शिकणे आणि सर्वांमध्ये संस्कृत शिक्षणाचा प्रसार करणे शक्य झाले. भविष्याचा दूरगामी विचार करून त्यांनी राधानगरी धरणाची उभारणी केली, शेतकऱ्यांसाठी धरणे, मोफत बी-बियाणे, बाजारपेठेची निर्मिती केली, शेतकरी कारखानदार बनावा म्हणून सहकार तत्वाची स्थापना केली. शाहू महाराज हे समाजातील सर्व स्तरांतील समानतेचे प्रखर पुरस्कर्ते होते आणि त्यांनी ब्राह्मणांना कोणताही विशेष दर्जा देण्यास नकार देण्याचे पाऊल उचलत त्यांनी ब्राह्मणांना राजधार्मिक सल्लागार पदावरून काढून टाकले. कुलकर्णी पद नष्ट करून पगारी तलाठी पदाची निर्मिती केली, पहिलवानांना, कलाकारांना राजाश्रय दिला, महात्मा फुलेंच्या कार्याचा शाहू महाराजांवर विशेष प्रभाव होता, स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी ही त्यांनी अनेक कामे केली स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी कन्या शाळा स्थापन केल्या, तसेच स्त्री शिक्षण या विषयावरही त्यांनी भरभरून भाष्य केले. देवदासी प्रथा, देवाला मुली अर्पण करण्याच्या प्रथेवर बंदी घालणारा कायदा त्यांनी आणला, ज्यामुळे मूलतः पुजारी, मौलवी, पाद्रींच्या हातून मुलींचे शोषण व्ह्याचे थांबले. १९१७ मध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आणि बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले, असा शाहूंचा धगधगधगता जीवनप्रवास तत्कालीन विषमतावादी व मनुवादी वृत्तीविरोधात बंड पुकारून खऱ्या अर्थाने नवीन समाजाची मुहूर्तमेढ करणारा ठरला” असे प्रतिपादन केले.
सदर प्रसंगी कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, चिटणीस विठ्ठल जाधव गुरुजी, चिटणीस अनिरुद्ध जाधव, उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश पवार, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, सचिव संजय मोहिते, कार्यालय सेवक प्रदीप तांबे, साहित्य क्रीडा समिती अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, निवडणूक मंडळाचे सदस्य अशोक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
सरतेशेवटी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने श्रीमंत छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना मानवंदना देण्यात आली व शाहू महाराजांचे कार्य पाहता त्यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांसारखीच थाटामाटात केली पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते म्हणून पुढील वेळेस मोठ्या सभागृहात हर्षोउल्हासात जयंती सादर करू असे नमूद करून सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सदर जयंतीमहोत्सव यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.