राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या नावाखाली अप्रत्यक्षपणे हिंदी भाषा लादली जात असल्याचा आरोप करत मनसेने राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने एक पाऊल मागे घेतले असून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली.






या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्हाला शासनाची भूमिका कुठल्याही प्रकारे मान्य नाही. सरकारने पटवून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.” यासोबतच राज ठाकरे यांनी ‘6 जुलै रोजी मराठी माणसांचा भव्य मोर्चा गिरगावहून निघणार,’ अशी घोषणा देखील केली आहे. या मोर्चाचे निमंत्रण शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मोठे मुद्दे!
- महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आता येऊन गेले, त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मी पूर्णपणे भूमिका फेटाळून लावली. आम्हाला हे मान्य नाही, असे त्यांना सांगितल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली.
- खरंतर ५ वी नंतरच पर्यायी भाषेचा मुद्दा आहे. त्यांना हे ही सांगितले की, NEP मध्ये असे काही नाही, हे राज्यांवर टाकले आहे. मग ते का करत नाही? सीबीएसई या शाळा आयएएस अधिकाऱ्यांसाठी काढण्यात आल्या. त्या शाळेचं वर्चस्व करायचे सुरू आहे. बाकी राज्य अशी भूमिका घेत नसताना महाराष्ट्रात हे का करत आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
- आमचा या संपूर्ण प्रकरणाला विरोध आहे आणि राहणारच आहे. हिंदी असेल किंवा इतर कोणत्या ही भाषेची सक्ती राहणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
- मी सर्व पक्षांना आवाहन करत आहे की, येत्या ६ जुलैला आम्ही गिरगाववरून मोर्चा काढायचे ठरवत आहे. यात कोणता ही झेंडा नसेल. हा मराठी माणसाचा मोर्चा असेल, आम्ही सर्वांना आमंत्रण देत आहोत. ६ जुलै रोजी सकाळी 10 वाजता हा मोर्चा असेल. मी बाकीच्या पक्षांसोबत बोलणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली.
- हा महाराष्ट्राचं मराठी पण घालवायचा कट आहे. मी कट बोलतोय, कारण हा कटच आहे. आज सर्वजण विरोध दर्शवित आहोत, असेही राज ठाकरे म्हणाले.
- मला हे ही बघायच आहे की, कोण-कोण या मोर्चात सहभागी होत आहे आणि कोण येणार नाही मला हे ही बघायच आहे. मला असे वाटत आहे की, ही महाराष्ट्राची लढाई आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. कोणत्याही वादाशिवाय महाराष्ट्रहितासाठी एकत्र आलं पाहिजे. या वाक्याचा अर्थ तुम्हाला मोर्चात कळेल.
- महाराष्ट्रचे सर्व राजकीय पक्ष आहे. त्यांच्याशी मी बोलणार आहे. आमची माणसे त्यांच्यासोबत बोलणार आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोर्चाचे निमंत्रण दिले आहे.
- मी मोर्चासाठी रविवार निवडला आहे. कारण मोर्चाला सर्व जण येऊ शकतील. हा मोर्चा गिरगाव ते आझाद मैदान, असा असणार आहे.
- मोर्चात कोणते कलाकार येतायेत ते बघायचंय. मी बोलल्यानंतर कलाकार येतील. महाराष्ट्रात इतके प्रश्न असतांना केवळ आपण भाषेवर का येतोय? कोणती मोठी गोष्ट लपवण्याकरता हे चाललंय? असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला.
- जेएनपीटीला रिक्त पदे आहेत. पण मुलाखती अदानी पोर्टला का सुरु आहेत? 6 तारखेच्या मोर्चाकरिता मी इतर राजकीय पक्षांसोबत बोलणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.










