पुणे शहरातील भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांवर महिला संबंधित प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाल्याने अडचणी वाढल्या आहेत; परंतु याप्रकरणी कोणतीही पुढील कार्यवाही न झाल्याने सत्तेचे अभय संबंधितांना कारवाईपासून रोखत आहे की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. गुन्हे दाखल झालेल्या दोन्ही पदाधिकाऱ्यांना अद्याप अटक झालेला नाही. मुळात महिलांच्या हक्कांच्या संदर्भात हिरारीने रस्त्यावरती उतरणाऱ्या भारतीय जनता पक्षातीलच पदाधिकारी अशा पद्धतीने वागत असल्याने पक्षाची प्रतिमा मधील होत आहे. विधानसभा मतदारसंघातील नेत्यांच्या जीवावर अटकेपासून संरक्षण मिळतंय का अशी चर्चा सुरु झाली आहे. यावरून भाजपावर विरोधक हल्लाबोल करत आहेत.






पुणे शहरात सध्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र या महत्त्वाच्या काळामध्ये भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्यांवर सलग दोन महिला-संबंधित प्रकरणांमुळे अडचणी वाढवल्या आहेत. पुण्यातील दोन वेगवेगळ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर महिलांविरुद्ध गैरवर्तनाचे आरोप झाले आहेत. त्यातील पुणे शहर भाजपचे सरचिटणीस(जुन्या कार्यकारणीतील) प्रमोद कोंढारे यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे. कोंढांरे यांच्यावर 14 जून रोजी एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांनी पक्षाकडे आपली बाजू मांडत राजीनामा दिला आहे. यावर भाजप महिला प्रश्नांबाबत अतिशय संवेदनशील आहे. आम्ही महिलांचा आदर करतो. कोंढरे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच पदाचा राजीनामा दिला आहे, अशी भूमिका पक्षाने स्पष्ट केली.
तर दुसऱ्या प्रकरणात 17 जून रोजी पुणे महापालिकेचे कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष ओमकार कदम यांच्याविरोधात दोन महिला अधिकाऱ्यानी विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. विरोधी पक्षांनी या दोनही प्रकरणांचा आधार घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांवर सलग महिलांविरोधात गुन्हे दाखल होणे धक्कादायक आहे. हे भाजपमध्ये काय सुरू आहे याचे लक्षण आहे अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून केली जात आहे.
अद्याप कुणालाही अटक नाही
पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये तपास सुरू केला असून पीडित महिलांचे जबाब नोंदवले जात आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की घटना गंभीर असून, पुरावे तपासले जात आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमकी भूमिका स्पष्ट होईल. विशेष म्हणजे या दोन्ही प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.











