परीक्षेत कमी गुण आल्यामुळे पित्याची मुलीला बेदम मारहाण, मुलीचा मृत्यू; आरोपी शिक्षक अटकेत

0
3

नीट (NEET) परीक्षेच्या सराव चाचणीत कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एका वडिलांनी आपल्या १६ वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी वडील धोंडीराम भोसले (वय ४५) हे स्थानिक शाळेतील शिक्षक असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

ही घटना शुक्रवारी रात्री नेलकरंजी गावात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी बारावीमध्ये शिकत होती व डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून गेली तीन वर्षे आटपाडीत राहून NEET परीक्षेची तयारी करत होती. काही दिवसांपूर्वी ती गावात एक कौटुंबिक कार्यक्रमासाठी आली होती.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडील संतप्त झाले आणि दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने जाड लाकडी मुसळाने मुलीवर जोरात वार केले. त्यावेळी त्याची पत्नी व मुलगा देखील उपस्थित होते. गंभीर दुखापत झालेल्या मुलीला तातडीने सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानुसार, एकापेक्षा अधिक गंभीर मार लागल्यामुळे मृत्यू झाला.

या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी धोंडीराम भोसले याला अटक करण्यात आली असून, २४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती आटपाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनायक बहिर यांनी दिली.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 103(1) तसेच बाल न्याय कायद्यातील कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.