गाडी ओव्हरटेक करण्यावरून रस्त्यातच हाणामारी; चौघांवर गुन्हा दाखल

0
1

कोरेगाव पार्क परिसरात रविवारी दुपारी कार ओव्हरटेक करण्यावरून दोन गटांमध्ये रस्त्यावरच जोरदार वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याने काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना दुपारी २.१५ च्या सुमारास एका प्रसिद्ध हॉटेलसमोरील रस्त्यावर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोर्शे आणि वॅगनआर गाड्यांच्या चालकांमध्ये ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. सुरुवातीला झालेली शाब्दिक बाचाबाच लवकरच शारीरिक झटापटीत बदलली. त्या ठिकाणी गर्दी जमल्याने वाहतूक कोंडी झाली.

घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात नेले.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

या प्रकरणी अचल दिनदयाल हरिंखेडे (पोलीस शिपाई, अँटी डकैत पथक, मुंढवा) यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार निमेश नागेश दिवाण (३८), नचिकेत निखिल दिवाण (२६), सोहा निनाद दिवाण (२०) – तिघेही वाकडमधील रहिवासी, आणि प्रेम वधवानी (३३), रा. हिंजवडी फेज २ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी चौघांवर सार्वजनिक शांतता भंग करणे आणि सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.