येवलेवाडी येथील ‘निसर्ग ग्राम’ या अत्याधुनिक निसर्गोपचार केंद्राला देश-विदेशातून मिळालेल्या उत्तम प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपथी (NIN) ने हे केंद्र येत्या काही महिन्यांत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
NIN च्या संचालिका डॉ. के. सत्य लक्ष्मी यांनी सांगितले, “सध्या १०० खाटांची सुविधा कार्यरत असून ती लवकरच २५० खाटांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यासाठी १५० हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू असून, त्यात प्राध्यापक, डॉक्टर, थेरपिस्ट यांचा समावेश आहे. बहुतेक पदांची नियुक्ती आणि मंजुरी पूर्ण झाली आहे.”
‘निसर्ग ग्राम’ हे देशातील पहिले सरकारी निसर्गोपचार रुग्णालय असून, अल्प कालावधीतच दक्षिण आफ्रिका, युगांडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथील रुग्णांनी येथे उपचार घेतले आहेत. या केंद्रात योग आणि निसर्गोपचार विषयात अंडरग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट, पीएचडी व फेलोशिप कोर्सेस देखील उपलब्ध आहेत.
सप्टेंबर २०२४ मध्ये बाह्यरुग्ण विभाग (OPD) सुरू करण्यात आला होता आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये अंतर्गत रुग्ण विभाग (IPD) सुरू झाला. सध्या सुमारे ६० जणांची टीम कार्यरत असून त्यात डॉक्टर, प्राध्यापक, थेरपिस्ट आणि प्रशिक्षार्थी थेरपिस्ट यांचा समावेश आहे. OPD मध्ये दरमहा ३०० वरून आता १,९०० रुग्णांपर्यंत वाढ झाली असून, IPD मध्ये सध्या ८० ते १०० रुग्ण दरमहा दाखल होतात. प्रत्येक रुग्णाचा सरासरी मुक्काम ७ ते ८ दिवसांचा असतो.
या केंद्रात प्राचीन निसर्गोपचार पद्धती आणि आधुनिक सुविधा यांचे संगम साधून मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, तणाव, पचनतंत्र विकार अशा विविध जीवनशैलीशी संबंधित आजारांवर उपचार केले जातात. यासोबतच योग, आहारतत्त्व, आरोग्यशिक्षण व वेलनेस कार्यक्रमांद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पुरवली जाते.
डॉ. सत्य लक्ष्मी म्हणाल्या, “आम्ही केंद्र हळूहळू कार्यान्वित करत आहोत कारण रुग्णांना कोणतीही अडचण होऊ नये. सकाळ-संध्याकाळ योगसत्रांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पूर्ण क्षमतेने केंद्र सुरू झाल्यानंतर निसर्गोपचाराबाबत जनजागृती मोहिमा राबवण्यात येणार आहेत.”