स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी सराईत असल्याचे काही पुरावे तपासादरम्यान समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ‘पीएमपी’, ‘एसटी’ स्थानकांवर रेंगाळत तेथील मुली, तरुणींना आपण पोलिस असल्याचे भासवून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न त्याने यापूर्वी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा तो ‘कार्यकर्ता’ असल्याचेही समोर आले झाले असून, त्याच्या संपर्कात राजकीय व्यक्ती, पोलिस कर्मचारीही असल्याचे प्राथमिक तपासात आढळले.






दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने बलात्काराच्या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी तो आपण पोलिस असल्याचे भासवायचा. त्याच्या संपर्कात आलेल्या राजकीय व्यक्ती आणि पोलिस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार, गाडे सातत्याने स्वारगेट एसटी स्टँडवर असावा; त्यामुळे त्याला तेथील पूर्ण माहिती होती. त्याचाच फायदा उठवून त्याने पीडित तरुणीला एसटी स्टँडवरील निर्जनस्थळी नेऊन बलात्कार केल्याचा तर्क लावण्यात येत आहे. स्वारगेट एसटी स्टँडवर महिला, मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही पोलिसांकडे येत होत्या. त्या त्या वेळी गस्त घालून, संशयितांची चौकशी करून त्यांना हाकलून देण्यात येत असे. मात्र, हे सराईत गुन्हेगार सातत्याने तेथे येत असल्याने, पोलिसी कारवाईवरही मर्यादा येत असल्याचे खासगीत सांगितले जाते.
गाडे हा घटनेच्या दिवशी रात्री किमान दीड-दोनपासून एसस्टी स्टँडवर असल्याचे काही पुरावे पोलिसांना मिळाल्यानंतर त्यानुसार तपासाची चक्रे फिरली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, त्याच्या घराची झडतीही घेण्यात आली आहे. त्याने कोणाशी संपर्क साधल्यास तातडीने पोलिसांना कळविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गाडेने याखेरीजही अनेक गुन्हे केले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. छेडछाडीच्या घटनांमध्ये तक्रारदार पुढे येत नसल्याने त्याचे धारिष्ट्य वाढल्याची शक्यता आहे. गाडेबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तोंडावर मास्क; तरी पटवली ओळख
स्वारगेट बस स्थानकातील काही सीसीटीव्हींमध्ये तोंडावर मास्क लावलेला आरोपी कैद झाला आहे. मास्कमुळे पोलिसांना त्याची ओळख पटवणे अवघड होते. पोलिसांनी या परिसरातील आणखी सीसीटीव्ही तपासले. खबऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर आरोपीची ओळख पटली.











