भारतीय क्रिकेट संघात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कसोटी संघाचे नेतृत्व आता युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आले असून, २० जूनपासून लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत गिल पहिल्यांदाच भारताचा कसोटी कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. मालिकेपूर्वीच त्याने आपल्या फलंदाजीचा ठसा उमठवत अर्धशतक ठोकले आहे.
टीम इंडिया आणि इंडिया-ए यांच्यात १३ जूनपासून बेकनहॅम येथे तीन दिवसीय इंट्रा-स्क्वॉड प्रॅक्टिस मॅच सुरू झाली आहे. यामध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील मुख्य भारतीय संघ आणि अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील इंडिया-ए संघ एकमेकांसमोर आहेत. इंग्लंड लायन्सविरुद्ध नुकतीच मालिका खेळलेल्या इंडिया-ए संघाला या सामन्याद्वारे वरिष्ठ संघासमोर आपली ताकद सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे.
या सामन्याचे मीडिया कव्हरेज बीसीसीआयने रोखले होते, त्यामुळे पहिल्या दिवशी खेळलेल्या सामन्याचे तपशील समोर आले नव्हते. मात्र, दिवसाअखेर बीसीसीआयने सोशल मीडियावर माहिती दिली की, शुभमन गिलने जबरदस्त फॉर्म दाखवत अर्धशतक ठोकले. त्याच्या जोडीला के.एल. राहुलनेही जबरदस्त फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. दोघांचे हे फॉर्म हेडिंग्ले कसोटीआधी भारतीय संघासाठी सकारात्मक संकेत आहेत.
फक्त फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही भारताचा अनुभव बोलका ठरला. शार्दुल ठाकुरने या सामन्यात सर्वाधिक विकेट घेत प्रभावी कामगिरी केली.
तरीही, गिलची परदेशातील कामगिरी आजवर सुसंगत राहिलेली नाही. त्यामुळे त्याची कर्णधार म्हणून चाचणी जितकी महत्त्वाची आहे, तितकीच त्यांची फलंदाजीसुद्धा कसोटीला लागणार आहे. आगामी हेडिंग्ले कसोटीत आणि पुढील चार सामन्यांत तो असा दमदार फॉर्म टिकवून ठेवतो का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असेल.