क्रिकेटमध्ये एखादा चेंडू किंवा ओव्हर संपूर्ण सामन्याचे चित्र बदलू शकतो, याचं जिवंत उदाहरण तमिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मध्ये गुरुवारी पाहायला मिळालं. तिरुपूर आणि सलेम यांच्यात रंगलेल्या सामन्यात तिरुपूरचा २३ वर्षीय वेगवान गोलंदाज ए. ईसाकीमुथु याने सामना फिरवणारा सर्वात लांब आणि महागडे १९वे षटक टाकले.
सलेमला जिंकण्यासाठी शेवटच्या दोन ओव्हरमध्ये ३१ धावांची गरज होती. तिरुपूरच्या कर्णधार साई किशोरने १९वी ओव्हर ईसाकीमुथुच्या हवाली केली. सलेमकडून भूपतीकुमार आणि हरीशकुमार फलंदाजी करत होते. त्यांनी पहिल्या पाच चेंडूंमध्ये एक षटकार आणि दोन चौकारांसह १७ धावा घेतल्या. पण खरा नाट्यपूर्ण क्षण ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर आला.
ईसाकीमुथुला शेवटचा वैध चेंडू टाकण्यासाठी तब्बल ५ वेळा प्रयत्न करावे लागले. त्यात ४ नो-बॉल्स होते. या गोंधळाचा फायदा घेत सलेमच्या फलंदाजांनी एकाच चेंडूत ८ धावा काढल्या.
यानंतर सलेमला शेवटच्या ओव्हरमध्ये केवळ ६ धावा हव्या होत्या. तिरुपूरकडून टी. नटराजनने अखेरची ओव्हर टाकली, पण सलेमने एक चेंडू राखूनच ४ गडी राखून विजय मिळवला.
ईसाकीमुथुने फेकलेल्या ११ चेंडूंची ओव्हर TNPL इतिहासातील सर्वाधिक लांब व महागडी ओव्हर ठरली. या एकट्या ओव्हरमध्ये त्याने २५ धावा दिल्या. संपूर्ण सामन्यात त्याने ४ ओव्हरमध्ये ५३ धावा दिल्या व एकही विकेट मिळवली नाही. सामन्यात सर्वाधिक धावा लुटवणारा तो एकमेव गोलंदाज ठरला. या ओव्हरमुळे तिरुपूरने हातात असलेला विजय गमावला, तर सलेमने संधीचा पुरेपूर फायदा घेत शानदार पुनरागमन करत सामना जिंकला.