इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडली; पहिली गुणवत्ता यादी २६ जूनला जाहीर होणार – विद्यार्थी आणि पालक आक्रमक

0
1

शालेय शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी १० जून ऐवजी आता २६ जूनला जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. तांत्रिक अडचणींच्या कारणामुळे प्रवेश प्रक्रिया सतत रखडत असून, विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ होत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

प्रवेश प्रक्रियेत सातत्याने विलंब
दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यंदा तरी वेळेवर प्रवेश प्रक्रिया व्हावी म्हणून इयत्ता दहावीचा निकाल १५ दिवस आधीच जाहीर करण्यात आला. मात्र, ऑनलाईन प्रवेश प्रणालीतील तांत्रिक अडथळे अद्यापही कायम आहेत.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया २१ मेपासून सुरू होणार होती, मात्र ती २६ मे रोजी सुरू झाली. नंतरही अनेक विद्यार्थ्यांना अर्ज सादर करताना अडचणींचा सामना करावा लागला. नोंदणीची अंतिम मुदत ७ जून रोजी पार पडली असली, तरी गुणवत्ता यादीचा विलंब पालक व विद्यार्थ्यांना हतबल करत आहे.

विद्यार्थी संघटनांचा संताप
नॅशनलिस्ट यूथ काँग्रेस (शरद पवार गट) मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल माटेले यांनी सरकारवर कडाडून टीका केली.

“शालेय शिक्षण विभाग अकरावी प्रवेश प्रक्रियेचा खेळ मांडत आहे. १० जूनला येणारी यादी आता २६ जूनला येणार म्हणजे तब्बल १६ दिवसांचा विलंब. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ सुरू आहे. नियोजनशून्यतेमुळे निर्माण झालेली अस्थिरता अमान्य आहे. लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया सुरळीत झाली नाही तर शिक्षण संचालकांना घेराव घालून आंदोलन करू.”

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

युवा सेनेचे नेते प्रदीप सावंत म्हणाले,
“मागच्या वर्षी निकाल उशिरा लागूनही पहिली यादी २८ जूनला जाहीर झाली होती. यंदा निकाल वेळेवर लागूनही यादी पुढे ढकलली जाते, यावरून प्रशासनाची कार्यक्षमता दिसते. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. दोन दिवसांत आंदोलनाबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.”

शिक्षक समुपदेशकांचा सल्ला

शिक्षक समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांनी “लाडके विद्यार्थी योजना” अशा योजना अमलात आणून विद्यार्थ्यांचा तणाव कमी करण्याचे आवाहन केले.

“प्रवेश प्रक्रिया शक्य तितकी सोपी आणि विनामूल्य ठेवावी. प्रशासनाने जबाबदारी स्वीकारून नव्या प्रणालीची योग्य अंमलबजावणी करावी.”

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे