नाना पेठ येथील एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. अवघ्या ८ वर्षांच्या मुलीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर शिवम उदयकांत आंदेकर याच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे समर्थ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. आंदेकरवर यापूर्वीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे.
१ जून रोजी नाना पेठेतील दोंडे तालिमीजवळ, “उदयनाथ आंदेकर चौक” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरात, एका बेकायदेशीर लोखंडी होर्डिंगला ८ वर्षांची मुलगी स्पर्श करत होती. यावेळी तिला जोरदार विद्युत धक्का बसला. तिचा वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ११ वर्षीय मुलालाही शॉक बसून गंभीर दुखापत झाली. मुलीला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोस्टमार्टम अहवालात विद्युतधक्का ही मृत्यूची कारणमीमांसा स्पष्ट झाली आहे.
प्रथम या घटनेची अपघाती मृत्यूची नोंद झाली होती. मात्र पुढील तपासात उघड झाले की शिवम आदेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी PMC ची कोणतीही परवानगी न घेता होर्डिंग उभारले होते. विशेष म्हणजे, रस्त्यावरील लाईट पोलमधून बेकायदेशीररीत्या विजेचा पुरवठा घेतला गेला होता. हा अवैध व अत्यंत निष्काळजीपणाचा प्रकार लोखंडी रचनेत करंट येण्यास कारणीभूत ठरला आणि त्यातूनच या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कायदेशीर कारवाई:
गुन्हा क्र. १:
शिवम आंदेकर व इतरांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०६(१) अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल.
गुन्हा क्र. २:
PMC च्या विद्युत विभागाने वीज चोरीबाबत तक्रार दिली असून, भारतीय विद्युत अधिनियमाच्या कलम १३५ अंतर्गत स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या दोन्ही प्रकरणांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिट्टे (समर्थ पोलीस ठाणे) करत आहेत. आंदेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.