मुंबई: मागील दोन दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह हे राज्याच्या दौऱ्यावर विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीचा आढावा त्यांनी घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे या महत्त्वाच्या महापालिकांबाबत अमित शाह यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 6 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला हिरवा कंदील दाखवला. पुढील चार महिन्यांत राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाच्या नगरविकास आणि ग्रामविकास विभागाला प्रभाग रचना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता आगामी काही महिन्यातच राज्यात पुन्हा एकदा निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकांसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे.
एकनाथ शिंदे यांनीदेखील घेतली भेट…
राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी मुंबईतही वास्तव्य केले. शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह यांची मंगळवारी सकाळच्या सुमारास भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील आगामी निवडणुकांबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे मुंबई महापालिकेतील 227 पैकी 107 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपल्याकडे 107 उमेदवार असल्याची माहिती शिंदे यांनी शाह यांना दिली. शाह यांनी शिंदे यांचे म्हणणे ऐकून घेतले मात्र त्यांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमित शाह यांच्या सूचना काय?
मित शाह यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला. शाह यांनी मुंबई, ठाणे, पुणे महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबतची चाचपणी करण्याचे निर्देश भाजप नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी सांगितले. या महत्त्वाच्या तीन शहरांसोबत आणखी काही महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्याची परिस्थिती आणि त्यातून यश मिळण्याची शक्यता किती, याचा आढावा घेण्याची सूचना शाह यांनी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबईत भाजपला सत्तेचे वेध…
2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगळे लढले. त्यावेळी एकसंघ असलेल्या शिवसेनेने 84 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने 82 पर्यंत मजल मारली होती. सध्या शिवसेनेत फूट पडली असून उद्धव ठाकरे यांची राजकीय ताकद बऱ्यापैकी कमी झाली आहे. तर, भाजपची ताकद वाढली असल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालात दिसून आले आहे. त्यामुळे भाजपला आता मुंबई महापालिकेत सत्तेचे वेध लागले आहेत.