सिद्धरामय्यांची कॅबिनेट 16 मंत्र्यांवर गंभीर गुन्हे; बी नागेंद्रवर 42 तर शिवकुमारांवर १९ गुन्हे दाखल

0

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नवीन मंत्रिमंडळात एकूण ३४ मंत्र्यांच्या समावेश आहे. या ३४ मंत्र्यांपैकी तब्बल १६ मंत्र्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. विविध प्रकरणाखाली या सर्व मंत्र्यांवर न्यायालयात खटले सुरू आहेत. यामुळे मंत्रिमंडळाचे विस्तार झाले असले तरी या मंत्रिमंडळात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा समावेश केला गेल्याने, यावर चर्चा सुरू झाली आहे.

निवडणुकीत उमेदवार म्हणून अर्ज सादर करताना, निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार सध्या ३४ पैकी १६ मंत्र्यांवर विविध प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल आहेत. यात सर्वाधिक गुन्हे हे नवे मंत्री बी नागेंद्र यांच्यावर दाखल आहेत. त्यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचा क्रमांक लागतो. मंत्री बी. नागेंद्र यांच्यावर तब्बल विविध प्रकरणातील ४२ गुन्हे प्रलंबित आहेत. तर उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यावर १९ गुन्हे दाखल आहेत.

अधिक वाचा  ….वारजे बदलतंय! केंद्रीय मंत्री ‘ॲक्टिव्ह’ पारंपारिक कट्टर विरोधक एकत्र विसावले!; सर्वांची गणिते बिघडली!

नागेंद्र यांची लोकायुक्तांकडून २१ प्रकरणात चौकशी सुरू आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चार प्रकरणात चौकशी सुरू असून राज्याच्या गुन्हे तपास विभागाकडून (सीआयडी) एका प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यावर सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ज्यात फसवणुकीच्या गुन्ह्याचा देखील समावेश आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर १३ गुन्हे दाखल आहेत. झमीर अहमद खान यांच्याविरुद्ध सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. ज्यात हत्येचे प्रमाण नसून निर्दोष मनुष्यवध, निष्काळजीपणाने मृत्युला कारणीभूत ठरणे, महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे किंवा बळजबरी करणे, फसवणूक, फसवणूक, धमकी अशा प्रकरणांचा समावेश आहे.

अधिक वाचा  पुण्यातील बाहुबली माजी नगरसेवकांचे भाजप पक्षप्रवेश; 22 माजी नगरसेवकांच्या हाती ‘कमळ’ या प्रभागात गणिते बदलली

दावणगीरी उत्तरचे आमदार एस. एस. मल्लिकार्जुन यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याविरुद्ध वन्य प्राण्यांच्या बेकायदेशीर निवासासाठी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. प्रियांक खरगे यांच्यावर ९, ईश्वर खांड्रे ७, एम.बी. पाटील ५, रामलिंगा रेड्डी ४, डॉ. जी. परमेश्वर ३, एच. के. पाटील, डी. सुधाकर, सतीश जारकीहोळी यांच्यावर प्रत्येकी २ , कृष्णा बायरेगौडा, एन चेलुवरायस्वामी, के. एच. मुनियप्पा या तिघा मंत्रांवर प्रत्येकी एक फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मंत्रिमंडळ करोडपतींनी भरले आहे. ३४ मंत्र्यांपैकी फक्त एकच मंत्री करोडपती नाही. तिम्मापूर रामाप्पा बाळप्पा यांनी घोषित सर्वात कमी म्हणजे एकूण संपत्ती ५८ लाख रुपये आहे. तर सर्वात श्रीमंत कोट्याधीश मंत्री म्हणून शिवकुमार अग्रस्थानी असून त्यांचे एकूण संपत्ती १,४१४ कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्या खालोखाल सुरेश बी. एस. यांची संपत्ती ६४८ कोटी, सतीश जारकीहोळी १७५ कोटी, एम बी पाटील १४१ कोटी, संतोष लाड १३८ कोटी, डी सुधाकर १३५ कोटी, रामलिंगा रेड्डी ११० कोटी तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे ५१ कोटींची संपत्ती आहे.

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार