पुणे: दिनांक ०७/०८/२०२० रोजी विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कस्तुरबा सोसायटीमध्ये ७ किलो गांजा विक्रीसाठी बाळगल्याच्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. हा निकाल मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत दिला.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ७ किलो गांजा बाळगल्याच्या संशयावरून दोन आरोपी आणि दोन अल्पवयीन मुलांना अटक केली होती. मुख्य आरोपी रोहित प्रकाश लंके व त्याचे वडील प्रकाश लंके यांना गांजा विक्रीसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते.
येरवडा कारागृहात असताना आरोपींनी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे वकिलांसाठी अर्ज केला होता. सचिव सोनल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य लोकभिरक्षक अँड. मयूर दोडके आणि नासीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली.
सरकार पक्षाने या प्रकरणात एकूण ८ साक्षीदार तपासले. अंतिम युक्तिवादाच्या वेळी, अँड. मयूर दोडके यांनी तपास प्रक्रियेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले. एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींचे पालन न झाल्याचे आणि जप्ती पंचनाम्यात विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे नेहमीचे पंच वापरण्यात आल्याने पुराव्याची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तपासातील त्रुटी आणि ठोस पुराव्याचा अभाव या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला.