काश्मीर ते जैसलमेर ते थेट भुजपर्यंत.. पाकिस्तानचा 26 ठिकाणी ड्रोन अटॅक, भारताकडून ‘करारा जवाब’

0
5

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले, मात्र त्यानंतरही पाकची खुमखुमी काही थांबलेली नाही. त्यांची आगळीक सुरूच असून पाककडून भारतावर हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे भारत-पाक दरम्यानचा तणाव आता शिगेला पोहोचला आहे. मात्र भारताने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला हाणून पाडला आहे. पाकिस्तानने जैसलमेरमध्ये 9, अमृतसरमध्ये 15 ड्रोन पाडले आणि श्रीनगर विमानतळ आणि अवंतीपोरा हवाई तळालाही लक्ष्य केले. पण पाकड्यांचा प्रत्येक प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला. गुरुवारपेक्षा शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात जास्त ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले आणि गोळीबार सुरू केला आहे. जम्मूमध्ये, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याची पुष्टी केली होती. जम्मू-श्रीनगर, पठाणकोट, फिरोजपूरमध्ये ब्लॅकआऊट झालं. सतत सायरनचा आवाज घुमत आहे. फिरोजपूरमध्ये भारतीय सैन्याने काही पाकिस्तानी ड्रोन पाडले आहेत. यासोबतच पोखरणमध्येही ड्रोन हल्ल्याची बातमी समोर आली आहे. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनी तिन्ही लष्करप्रमुख, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोभाल यांच्यासोबत बैठक घेतली. राजौरीमध्येही ब्लॅकआऊटदरम्यानच फायरिंगचे जोरदार आवाज येत आहेत.

एअरपोर्ट आणि एअरबेसवरीव हल्ल्याचे प्रयत्न अयशस्वी

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

श्रीनगर विमानतळ आणि अवंतीपुरा येथील हवाई तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. पाकिस्तानने सुमारे 15 ड्रोनने श्रीनगरवर हल्ला केला. मात्र भारतीय लष्कराने विमानतळाजवळ ड्रोन पाडला आणि हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला. तर, अवंतीपोरा येथील ड्रोन हल्ला एअर डिफेन्स गनने पाडला गेला, अनंतनागमधील ड्रोन हल्ला देखील अयशस्वी झाला. आतापर्यंत काश्मीरमध्ये कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. ड्रोन कटानंतर जम्मूच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार सुरू झाला.

भारताने 26 ठिकाणी ड्रोन हल्ले उधळले

पाकिस्तानने शुक्रवारी सलग दुसऱ्या रात्री जम्मू-काश्मीरपासून गुजरातपर्यंत 26 ठिकाणी ड्रोन हल्ले केले. शत्रूच्या हवाई तळांसह महत्त्वाच्या प्रतिष्ठानांवर केलेले हल्ले उधळून लावण्यात आले, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले. पंजाबमधील फिरोजपूर येथे रात्रीच्या अंधारात केलेल्या हल्ल्यात एका कुटुंबातील काही सदस्य जखमी झाले. हल्ल्यात नागरिक जखमी झाल्याची ही एकमेव घटना होती. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या सर्व राज्यांमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला.

सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि सतत लक्ष ठेवले जात आहे आणि घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे संरक्षण मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळील 26 ठिकाणी ड्रोन दिसले. यामध्ये संशयास्पद शस्त्रे वाहून नेणारे ड्रोन समाविष्ट आहेत, असं संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितलं.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

या ठिकाणी बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, जैसलमेर, बारमेर, भुज आणि लक्की नाला यांचा समावेश आहे, असं ते म्हणाले. फिरोजपूरमधील एका निवासी भागाला एका सशस्त्र ड्रोनने लक्ष्य केले, ज्यामध्ये स्थानिक कुटुंबातील काही सदस्य जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितलं.

सुरक्षा दलांनी परिसर रिकामा केला

जखमींवर तात्काळ उपचार करण्यात आले आणि सुरक्षा दलांनी परिसर रिकामा केला. परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आवश्यकतेनुसार कारवाई केली जात आहे, असे प्रवक्त्याने सांगितलं. नागरिकांनी, विशेषतः सीमेजवळ राहणाऱ्यांनी, घरातच राहावे, अनावश्यक हालचाली मर्यादित कराव्यात आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असा सल्ला मंत्रालयाने दिला आहे.

पाकिस्तानी ड्रोन पाडला

पाकिस्तानने केलेला हा ताजा हल्ला अशा वेळी झाला आहे, ज्याच्या फक्त एक दिवस आधीच भारताने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे भारतीय लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानी सैन्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. पाकिस्तानी ड्रोन पाडल्यानंतर बारामुल्ला जिल्ह्यातील आकाश तेजस्वी प्रकाशाने भरून गेले. जम्मू प्रदेश आणि दक्षिण काश्मीरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि सायरन वाजले, ज्यामुळे केंद्रशासित प्रदेशातील अनेक भाग अंधारात बुडाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेजारच्या पंजाबमधील जम्मू, सांबा आणि पठाणकोट जिल्ह्यातही ड्रोन दिसले असून त्यांना निष्क्रिय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

घराचे लाईट बंद करा

श्रीनगरमधील मशिदींमधील लाऊडस्पीकरचा वापर करून, खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिकांना त्यांच्या घरातील दिवे बंद करण्यास सांगण्यात आले.जम्मू आणि पंजाबमधील नागरोटा आणि उधमपूर येथेही ड्रोन दिसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केलं. जम्मू आणि सांबा जिल्ह्यातील सुचेतगड आणि रामगड सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमेपलीकडून जोरदार गोळीबार सुरू आहे.

अफवांकडे लक्ष देऊ नका

“मी जिथे आहे तिथून, अधूनमधून स्फोटांचे आवाज ऐकू येतात, ” असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी अंधारात बुडालेल्या शहराचा फोटो देखील पोस्ट केला आणि जम्मूमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याचे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते. “जम्मू आणि आसपासच्या सर्व लोकांना माझे नम्र आवाहन आहे की कृपया रस्त्यावर येऊ नका, घरीच राहा किंवा अशा जवळच्या ठिकाणी जा, की जिथे तुम्ही पुढील काही तास आरामात राहू शकाल.” असे दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले. अफवांकडे लक्ष देऊ नका,अफवा पसरवू नका असा सल्ला देतानाच आपण एकत्रितपणे यावर तोडगा काढू, याचा सामना करू असा विस्वास त्यांनी व्यक्त केला.