पुणेकरांसाठी खुशखबर! पाणीकपात नाही १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा; उन्हाळी पिकांसाठी नऊ टीएमसी पाणी देण्याबाबत मान्यता

0
1

सध्याच्या कडक उन्हाळ्यात पुणेकरांना सुखावणारी बातमी आहे, ती म्हणजे पावसाळ्यापर्यंत शहरात पाणी कपात होणार नाही. १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठी धरणात असून, गतवर्षीपेक्षा यंदा खडकवासला धरण साखळीत दोन टक्क्यांनी पाणी अधिक आहे. त्यामुळे शेती सिंचनासाठीही पुढील दोन महिने पाणी देण्यात येणार आहे. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे सर्वांना पाणी दिल्यानंतरही जवळपास एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी शिल्लक राहणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये बुधवारी (ता. ९) ११.९१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. पुणे शहराला दररोज एक हजार ४६० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी वापरात येते. याप्रमाणे १५ जुलैपर्यंत पुढील ९८ दिवसांसाठी ४.९९ टीएमसी पाणी लागणार आहे. तेवढे पाणी खडकवासला प्रकल्पात आरक्षित ठेवण्यात आले आहे.

पुण्यासाठी खडकवासला प्रकल्पामधील वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या चार धरणांतून पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व धरणांमध्ये सध्या ४०.८३ टक्के पाणी उपलब्ध असल्यामुळे येत्या उन्हाळ्यात पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार नाही.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

गतवर्षी ३८.१५ टक्के इतका म्हणजेच ११.१२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता, तो या वर्षी दोन टक्क्यांनी अधिक आहे. दरम्यान, पुण्याच्या काही भागांत कमी दाबाने पाणी मिळत असल्याच्या तक्रारी काही लोकप्रतिनिधींनी कालवा समितीच्या बैठकीनंतर केल्या होत्या.

या वर्षी खडकवासला प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी आहे. शेती व पुणे शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी पुढील तीन महिन्यांत प्रत्येकी पाच टीएमसी पाणी दिले जाईल. त्याव्यतिरिक्त एक टीएमसी पाणी शिल्लक राहील. आवश्यकतेनुसार त्या पाण्याचा वापर केला जाईल. त्यामुळे या वर्षी पाणीकपात केली जाणार नाही.

– श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प

पहिले आवर्तन २५ एप्रिलपर्यंत

या वर्षीच्या उन्हाळ्यात तापमानात तीव्र वाढ; किमान ०.७८ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन अपेक्षित

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

शेती सिंचनासाठी उन्हाळी आवर्तन मार्च महिन्यात सुरू

या आवर्तनात आत्तापर्यंत सुमारे ४.५ टीएमसी पाणीपुरवठा

पहिले आवर्तन साधारणपणे २५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार; त्यासाठी आणखी दीड टीएमसी पाणी लागणार

दुसऱ्या आवर्तनासाठी साडेतीन टीएमसी

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीसाठी दुसरे आवर्तन मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्यात येईल. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उन्हाळी पिकांसाठी नऊ टीएमसी पाणी देण्याबाबत मान्यता देण्यात आली. त्यामुळे दुसरे उन्हाळी आवर्तन हे तीन ते साडेतीन टीएमसीचे असेल. मे महिन्यात हे आवर्तन देण्यात येईल. पालखी सोहळा जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात आहे. त्या वेळीही कालव्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

धरणातील पाणीसाठा (आजचा)

धरणाचे नाव –            पाणीसाठा (टीएमसी) – टक्केवारी

खडकवासला –                       १.०६ –            ५३.७८

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

पानशेत –                                ४.३० –            ४०.३३

वरसगाव –                                ६.१७ –            ४८.१०

टेमघर –                                 ०.३८ –            १०.२१

एकूण –                                 ११.९१ –            ४०.८३