डॉ. घैसासांचे क्लिनिक फोडणाऱ्यांना मंत्री पाटील-मोहोळांचे पाठबळ; मेधा कुलकर्णी एकाकी बैठक अर्धवट सोडून गेल्या?

0
1

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये घडलेल्या प्रकाराच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान भाजप महिला मोर्चाकडून तोडफोड करण्यात आली होती. या आंदोलनावरून भाजपमधील अंतर्गत मतभेद समोर आले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या भाजपच्या (BJP) बैठकीमध्ये या आंदोलनाचं समर्थन करण्यात आल्याचं समोर आलं आहे. तसेच ही बैठक संपण्यापूर्वीच खासदार मेधा कुलकर्णी काही कामानिमित्त बैठक अर्धवट सोडून निघून गेल्याच पाहायला मिळत आहे.

भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्यासह भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात आक्रमकपणे आंदोलन करत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाशी संबंधित असलेल्या डॉ. घैसास यांच्या खासगी दवाखान्याची तोडफोड केली होती. या तोडफोडीनंतर भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र पाठवून याबाबत नाराजी कळवली होती.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

या पत्रात त्यांनी, कुठल्यातरी सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचे काम नाही. पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनवण्यासाठी वेळ लागतो. परंतु अशा काही गोष्टींमुळे प्रतिमा डागाळली जाते व त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो. शिवाय वडाचे तेल वांग्यावर काढल्यामुळे विनाकारण एखा‌द्या व्यक्तीचे एखाद्‌या समूहाचे, किंवा विशिष्ट समाजाचेही कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, असं म्हटलं होतं.

त्यानंतर शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी देखील हे विषय पक्षाच्या बैठकीत बोलायचे असून असं माध्यमांमध्ये हे विषय बोलणे चुकीचं असल्याचं सांगितलं होतं. यामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपची मंगळवारी शहर पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह अन्य नेते मंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाचं समर्थन करण्यात आलं.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

बैठकी दरम्यान बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आंदोलन त्यांच्या घरातील प्रश्नासाठी नव्हते, तर संघटनेसाठी केलेले आंदोलन होते. आंदोलन करताना ते चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असले, तरी कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करणे बरोबर नाही.”

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील या बैठकीमध्ये बोलताना आंदोलनाचा समर्थन केलं मोहोळ म्हणाले, “19 वर्षांपूर्वी आंदोलन करताना माझ्याकडून देखील तोडफोड झाली होती, ते चुकीचीच होती. मात्र, कार्यकर्ता म्हणून पक्ष माझ्यासोबत राहिला. आपल्या पक्षातील नेता चुकीचे सांगत असेल, तर तुम्ही चुकीचे बोलत आहे स्पष्टपणे सांगायला हवं, असं मोहोळ म्हणाले.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

दरम्यान, पक्षाची बैठक सुरू होण्यापूर्वी खासदार मेधा कुलकर्णी बैठकच्या ठिकाणी उपस्थित होत्या. मात्र, चंद्रकांत पाटील आणि त्या पाठोपाठ मुरलीधर मोहोळ बैठकीला आल्यानंतर त्यांची भाषणे होण्याआधीच खासदार कुलकर्णी बैठक अर्धवट सोडून निघून गेल्याचं समोर आले आहे. यावेळी आपण बैठकीपूर्वी दीड तास या ठिकाणी आलो होतो आणि आपले पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने आपण जात असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं.