गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. आज 32 महिला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असल्याचे पत्र समोर आलं.मात्र हे पत्रच फेक असल्याचा दावा शहरप्रमुखांकडून करण्यात येत आहे.
सध्या समाजमाध्यमांमध्ये 32 महिला पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या पक्षाचा राजीनामा दिला असल्याचं पत्र व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये नुकत्याच झालेल्या पक्षाच्या महिला आघाडी नियुक्त्यांवर आम्ही सर्व महिला नाराज असून पक्षाचा राजीनामा देत आहोत, असे म्हटले आहे.
राजीनामा देत असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांपैकी बऱ्याच महिला पदाधिकारी या जवळपास 15 ते 20 वर्षांपासून पक्षात कार्यरत आहेत. या सर्वांचा सन्मान न राखता तसेच विचारात न घेता अलीकडील पक्षात आलेल्या महिलांना नियुक्त्या दिलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्व नाराज असून, पक्षाचा राजीनामा देऊन, कुठेही न जाता घरात बसत आहोत, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
पत्रावर संबंधित महिलांच्या नावासमोर त्यांच्या स्वाक्षऱ्याही आहेत. दरम्यान, हे पत्र समोर आल्यानंतर या महिला पदाधिकारी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख यांनी राजीनाम्याचे पत्र आमच्यापर्यंत पोहोचलेलं नसल्याचं सांगितलं. पत्र फेक असल्याचा दावा देखील गजानन थरकुडे यांनी केला. पक्षाचे लेटर हेड काढून कोणीही अशा पद्धतीचा खोडसाळपणा करू शकतो, या पत्रावर महिला आघाडी असं नमूद करण्यात आले असले तरी त्या ठिकाणी कोणत्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्याचं नाव लेटरहेडवर असल्याचे पाहायला मिळत नाही.
या पत्रामध्ये स्वाक्षरी असल्याचा काही महिलांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचं आपल्याला सांगितल्याचा दावा देखील गजानन थरकुडे यांनी केला आहे. त्यामुळे नेमकं या राजीनामा पत्रामागचं गौडबंगाल काय आहे, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, यातील काही महिला पदाधिकारी आपण पदाचा राजीनामा दिला असल्याचे मान्य करत पक्षांमध्ये आपण कायम राहणार असल्याचे खाजगीत सांगत आहेत. मात्र, याबाबत त्यांनी माध्यमांशी बोलायला नकार दिला आहे. त्यामुळे हे राजीनामा पत्र दबाव तंत्राचा भाग होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.