देशातील पहिलाच उसाचा ‘एआय’ प्रयोग यशस्वी एकरी १०४ ते १५० टनांपर्यंत उत्पादन वाढ; खर्च अन् पाण्यातही सुमारे ३० टक्क्यांची बचत

0

बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशएल इंटेलिजन्स) प्रभावी वापराचा देशातील पहिलाच प्रयोग यशस्वी झाला आहे. या प्रयोगामुळे ऊस उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहे, शिवाय खर्च आणि पाण्यातही सुमारे ३० टक्क्यांची बचत झाली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील पहिल्या टप्प्यातील विविध वाणांच्या तीन प्लॉटवरील ऊस तोडणी पूर्ण झाली असून, त्यातून एकरी १०४ ते १५० टनांपर्यंतचे उत्पादन मिळाले आहे.

बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने हा प्रयोग राबवला. ज्येष्ठ नेते शरद पवार, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त आणि ‘सकाळ माध्यम’ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मागच्याच वर्षी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेला आणि पारंपरिक शेती पद्धतीने ऊस लागवड केलेला असे दोन स्वतंत्र प्लॉट तयार केले.

त्यात सीओ ८६०३२, सीओ एम २६५, एमएस १०००१, पीडीएन १५०१२, सीओ व्हिएसआय ८००५ आणि सीओ व्हिएसआय १८१२१ या सहा प्रकारच्या ऊस वाणांची लागवड या ठिकाणी करण्यात आली. त्यापैकी सीओ एम २६५, पीडीएन १५०१२ आणि सीओ व्हिएसआय ८००५ या तीन वाणांची तोडणी पूर्ण झाली. त्यातून कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आणि पारंपरिक पद्धतीच्या दोन्ही उसांची उत्पादकता, खर्च, पाण्याचा वापर याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत, हे निष्कर्ष या प्रयोगाची यशस्विता दाखवून देत आहेत.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

‘एआय’चे निष्कर्ष

पहिल्या टप्प्यात ऊस तोडणी झालेल्या तीन वाणांपैकी सीओ एम २६५ या वाणाचे एकरी उत्पादन १५०.१०टन, पीडीएन १५०१२ या वाणाचे १२०.४० टन आणि सीओ व्हिएसआय ८००५ या वाणाचे १०४.७८ टन उत्पादन मिळाले, सध्याच्या या वाणांच्या उत्पादकतेचा विचार करता, ही उत्पादकता वाढ जवळपास ४० टक्क्यांहून अधिक आहे. त्याशिवाय ‘एआय’ तंत्राच्या वापरातून २६५ या उसाची उंची २४.१ फूट आणि वजन प्रति ऊस ४.५६ किलोपर्यंत मिळाले.

जे की पारंपरिक पद्धतीच्या ऊसात या वाणाची उंची १८.६ एवढी राहिली, तर वजन २.५ फुटापर्यंत मिळाले. ‘एआय’च्या वापरामुळे नेमकी आणि गरजेएवढीच खते मिळाल्याने जमिनीचा सेंद्रिय कर्बही टिकून राहिला. ‘एआय’च्या प्लॉटमधील सेंद्रिय कर्ब १.० टक्के मिळाला, तर पारंपरिक लागवडीच्या क्षेत्रात तो ०.६८ टक्के एवढाच राहिला. तर खर्चही ३० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. येत्या पंधरवड्यात उर्वरित तीन प्लॉटवरील ऊसतोडणी पूर्ण केली जाणार आहे. ‘एआय’ करते तरी काय?

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

एआयच्या माध्यमातून वेदर स्टेशनच्या सेन्सरद्वारे आणि सॅटेलाइट मॅपद्वारे शेतीतील पिकांचे मॉनिटरिंग केले जाते. शेतीमधील माती, जमिनीची, खतांची माहिती, वातावरण बदलाची माहिती आणि उसाला नेमकी गरज काय आहे, याची नेमकी माहिती त्यातून मिळते. या वेदर स्टेशनमध्ये जवळपास १२ प्रकारचे पॅरामीटर्स आहेत, त्यात झाडाच्या मुळाजवळ ७ इंचांवर प्रायमरी सॉइल मॉइश्‍चर आणि सेकंड सॉइल मॉइश्चर असे दोन सेन्सर बसवले आहेत, ते हे सर्व कार्य करतात. त्यातूनच मग जमिनीचा ओलावा, तापमान आणि बदल याची माहिती मिळते. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण पिकाचे सॅटेलाइटद्वारे मॉनिटरिंग केले जाते आणि त्याबाबतचे अलर्टही सातत्याने शेतकऱ्यांना त्यांच्याकडील अॅपवर मिळतात.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग

शेतीमध्ये तसेच ऊस शेतीत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान तसेच विविध संशोधन समोर आले असतानाही आजही अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात, शेतीतील परिपूर्ण माहितीच्या अभावामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादनदेखील घटते. पण आता ‘एआय’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या या प्रयोगाने शेतकऱ्यांना उत्पादनातील शाश्वतता वाढली आहे. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आज १००० शेतकऱ्यांच्या ऊसशेतीत या तंत्राचा वापर सुरू केला आहे. आता पुढे जाऊन शेतकरी गट किंवा गावांनाही सामूहिक पद्धतीने हा प्रयोग राबवता येऊ शकतो.