मर्जीतील ठेकेदाराला सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम न मिळाल्याच्या रागातून माजी नगरसेवकाने ठेकेदाराच्या कामगारांना बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सहकार नगर भागात घडली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कामातील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करा असे आदेश अभियंतांना दिलेले असले तरीही त्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. महापालिकेच्या मलनि:सारण विभागातर्फे अरणेश्वर ते पदमावती मंदिर या दरम्यान आंबील ओढ्यातून १२०० मिमी व्यासाची सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी महापालिकेने ५ कोटीपेक्षा जास्त रकमेची निविदा मंजूर केली आहे.






या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असताना महापालिकेच्या काही माजी नगरसेवकांनी त्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे यासाठी खटाटोप केलेला होता, रिंग करण्याचा प्रयत्न असफल झाला. त्यानंतर या कामात अधिकाऱ्यांकडे पैशाची मागणी करण्याचाही प्रयत्न झालेला आहे. पण माजी नगरसेवक व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना त्यात यश आलेले नाही. या अडवणुकीमुळे दीड महिना उशिराने कार्यादेश देण्यात आला.
अरणेश्वर ते पद्मावती यादरम्यान काम करताना या राजकीय मंडळींनी या कामावर हरकत घेत जवळपास दोन ते तीन आठवडे काम थांबवून ठेवलेले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी पुन्हा एकदा सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले होते.
पण आज सकाळी काम सुरू झाले असता माजी नगरसेवकाने आणि त्याच्या चार-पाच सहकाऱ्यांनी तेथे काम करणाऱ्या मजुरांना, जेसीबी चालकाला बेदम मारहाण करून पळून लावल्याने हे काम बंद पडलेले आहे. राजकीय दहशतीमुळे या ठिकाणी काम करण्यास या कामगारांनी नकार दिलेला आहे. मलनि:सारण विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी जाउन प्रकाराची माहिती घेतली. या प्रकरणात सरकारी कामात गुन्हा दाखल करावा या संदर्भातील आदेश देण्यात आलेले होते पण रात्री उशिरापर्यंत त्याबाबत कारवाई झालेली नाही.
मलनि:सारण विभागाचे अधीक्षक अभियंता दिनकर गोजारे म्हणाले, ‘सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम चालू असताना आज तेथील कामगारांना काही लोकांनी मारहाण केलेली आहे. हे लोक कोण आहेत हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. यासंदर्भात सरकारी कामात अडथळाल्याचा गुन्हा दाखल करा अशी आदेश अभियंत्यांना दिलेले आहेत.
कामाच्या ठिकाणी अभियंता अनुपस्थित
महापालिकेचे कोट्यावधी रुपयांचे काम चालू असताना त्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेच्या अभियंताने त्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक होते. पण ही घटना घडली तेव्हा तेथे एकही अभियंता उपस्थित नव्हता.
तसेच वरिष्ठांनी घटनास्थळी जाण्याचे आदेश दिल्यानंतर व कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितल्यानंतरही त्यांना दिवसभरात काय केले याची माहिती रात्री उशिरापर्यंत देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे महापालिकेचे अभियंता देखील या प्रकरणात कुचराई करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.











