पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारामध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून फरार झालेला दत्ता गावडे अजूनही पोलिसांच्या हातात लागला नाही. दत्ता गावडेचं लोकेशन सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा फौजफाटा, डॉग स्कॉड पथक आणि संपूर्ण यंत्रणेनं त्याच्या गावात शोध घेतला पण संध्याकाळपर्यंत तो काही हाती लागला नाही. त्यामुळे दत्ता गाडेचा शोध सुरूच राहणार आहे. पण, इतका मोठा फौजफाटा घेऊन शोधण्यासाठी निघालेल्या पोलिसांच्या शोधमोहिमेचा मात्र फज्जा उडाला आहे.






स्वारगेट बस आगारमध्ये एका २६ तरुणीवर बलात्कार प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरून गेला. या प्रकरणाला नराधम दत्ता गाडे आपल्या गावी पळून गेला होता. त्याच्याबद्दल धक्कादायक खुलासे झाले. मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी त्याचा माग काढला. आज सकाळपासून शिरुर तालुक्यातील गुणाट गावातील शेतशिवारात आरोपी मुक्कामी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर १०० पोलीस, ड्रोन कॅमेरे आणि डॉग स्कॉडसह पोलीस दल गावात पोहोचलं.
गाडे दिवसभर ज्या घरात थांबला तिथे पोलीस पोहोचले पण पसार झाला होता. त्यानंतर गाडे हा रात्रीच्या मुक्कामाला शेतात गेला, याच शेतात आरामाचे कपडे झाडाखाली सापडले होते. पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने संपूर्ण २५ एकरचा परिसर शोधून काढला. पण तो कुठेच आढळला नाही. अखेरीस दत्ता गाडेच्या शोधमोहिमेला गेलेला पोलीस पथक आणि ग्रामस्थांच्या पथकाला परत येण्याच्या सुचना देण्यात आली. २५ एकर परिसरातील शेतशिवाराची पाहणी करुनही दत्ता गाडेचा शोध लागला नसल्याने शोध पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले. त्यामुळे त्याचा शोध कधी लागणार हे प्रश्न आताही कायम आहे.
पुणे पोलिसांचं आवाहन
गुणाट गावातील आरोपी दत्ता गाडेला शोधण्याची आजच्या दिवसाची शोध मोहीम राबविण्यात येत होती. ती थांबविण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहिमेला सुरुवात होणार आहे. पुणे पोलिसांनी ग्रामस्थांना देखील रात्रीच्या वेळी आरोपी दिसला तर कळवण्याचे आवाहन केले आहे.
दत्ता गाडेवर अनेक गुन्हे दाखल
दरम्यान, दत्तात्रय गाडे याच्यावर शिरूर, शिक्रापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात जबरी लुटीचे गुन्हे दाखल आहेत. एकट्या वयस्कर महिलांना चारचाकीमध्ये लिफ्ट देऊन त्यांना लुबाडण्याचे उद्योग गाडे करत होता. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडेवर 2020 मध्ये जबरी लूट, दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे 2, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा, केडगाव आणि कोतवाली पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 असे पाच गुन्हे गाडेवर दाखल आहेत. याशिवाय शिरूरच्या गुन्ह्यात दत्तात्रय गाडे शिक्षा भोगून तीन वर्षांपूर्वी कारागृहातून बाहेर आला होता.











