एक भुवई तिरकस उंचावत पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा इशारा किंग कोहलीचा मोठेपणा “भर मैदानात केले कौतुक!”

0

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत रविवारी (२३ मार्च) भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्यात भारताने अत्यंत संयमी खेळ करत पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात आधी गोलंदाजांनी पाकिस्तानी संघाचं कंबरडं मोडलं, त्यानंतर विराट कोहलीचं शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा पराभव केला. दरम्यान, या सामन्यानंतर पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद चर्चेत आहे. एका बाजूला मैदानातील वर्तनामुळे त्याच्यावर टीका चालू आहे तर दुसऱ्या बाजूला त्याच्या उत्तम गोलंदाजीमुळे त्याचं कौतुकही होत आहे. शतकवीर विराट कोहलीने देखील अबरारच्या कोट्यातील १० षटकं पूर्ण झाल्यावर त्याच्याशी हस्तांदोलन केलं, त्याच्या उत्तम गोलंदाजीसाठी त्याची पाठ थोपटली. त्यामुळे विराटवरही त्याच्या खिलाडूवृत्तीमुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुबमन गिल व विराट कोहली या दोघांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी ६९ धावांची भागिदारी केली. मात्र १०० धावा पूर्ण झालेल्या असताना शुबमन गिल अबरार अहमदच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर एक भुवई तिरकसपणे उंचावून अबरारने शुबमन गिलला पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा इशारा केला. मैदानात त्याने केलेली ही कृती कॅमेरात कैद झाली. यानंतर अबरारला लोक चांगलंच ट्रोल करू लागले आहेत. त्याच्या गोलंदाजीचं कौतुक होत असतानाच त्याच्या कृतीने मात्र भारतीय चाहते चांगलेच संतापले.

विराटची खिलाडूवृत्ती

मैदानातील त्या कृतीमुळे टीका होत असली तरी अबरारने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती हे नाकारून चालणार नाही. त्याच्या गोलंदाजीचा सामना करणाऱ्या भारतीय फलंदाजांनाही त्याची जाणीव आहे. त्यामुळेच अबरारची १० षटकं पूर्ण झाल्यानंतर विराटने त्याची पाठ थोपटली. अबरारने या सामन्यात त्याच्या कोट्यातील १० षटकांत केवळ २८ धावा देत एक गडी बाद केला. त्याच्यासमोर भारतीय फलंदाज अडखळत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळेच विराटने त्याचं कौतुक केलं. विराटची ही खिलाडूवृत्ती पाहून त्याच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर

एकटा अबरार भिडला

अबरारव्यतिरिक्त इतर कोणत्याही पाकिस्तानी गोलंदाजाला भारतीय फलंदाजांनी डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. शाहीन आफ्रिदीने दोन बळी घेतले खरे मात्र, त्याच्या ८ षटकात भारतीय फलंदाजांनी ७४ धावा लुटल्या. तर, खुशदील शाहने ७.३ षटकांत ४३ धावा देत १ बळी घेतला. इतर गोलंदाजांना एकही बळी घेता आला नाही.