पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे.अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला चितपट करत मैदान मारलंय. पृथ्वीराज मोहोळला अजित पवारांच्या हस्ते चांदीची गदा देण्यात आली. यानंतर उपस्थित पैलवानांनी पृथ्वीराज मोहोळला खांद्यावर उचलून जल्लोष केला. तर दुसरीकडे माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं असं म्हणत वडिलांना खांद्यावर घेऊन मोहोळने मैदानात जल्लोष केला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा झाल्यापासून अंतिम लढतीत विजय होण्यापर्यंत सर्वत्रच पुण्यातील काका पवार यांच्या मल्लांचा दबदबा कायम पाहण्यास मिळाला आहे. परंतु ज्या ज्या वेळी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीमध्ये काका पवार यांच्या मल्यांना मल्लांना धोका निर्माण होतो त्या त्यावेळी सामूहिक प्रकारे वेगवेगळे गोंधळ घालण्याचे हातखंडे यापूर्वीही राबवण्यात आल्यामुळे अहिल्यानगरच्या कुस्ती आयोजनामध्येही त्याचे दर्शन झाले.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड – पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. अटीतटीच्या या लढतीमध्ये महेंद्र गायकवाड याने अचानकपणे मैदान सोडल्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळ यांना विजयी घोषित केलं, मोहोळ यांना विजयी घोषित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती राम शिंदे यांचे हस्ते गदा देऊन मोहळचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर माझ्या आजोबांचं वडिलांचं आणि माझं स्वप्न ही पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज मोहळने दिली आहे.
कुस्ती क्षेत्रामध्ये काका पवार यांचे अमूल्य योगदान असले तरीसुद्धा मागील काही काळापासून कुस्ती आयोजनामध्ये आपला दबाव कायम राखण्यामध्ये प्राधान्य देण्यात मशगुल असल्याचे पाहण्यास मिळाले. गादी विभागातील त्यांच्या मल्लाने केलेले कृत्य अत्यंत निंदनीय आहे. तर अंतिम सामन्यामध्ये वारंवार अडथळा आणण्याची रणनीती आखत काका पवार यांच्या चमूने अंतिम सामन्याच्या लढतीमध्ये कायम आक्षेप घेण्याची भूमिका घेतली खरी परंतु संबंधित सामना आपल्या हातातून जाणार याची लक्षणे दिसू लागल्यानंतर अत्यंत मानाच्या असलेल्या महाराष्ट्र केसरी लढतीतूनच पळ काढण्याचे काम केल्यामुळे काका पवार यांच्या अधिपत्याखाली कुस्तीचे कोणते धडे शिकवले जातात हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोण आहे पृथ्वीराज मोहोळ?
पृथ्वीराज मोहोळ हा पुण्यातील खालकर तालीमचा पैलवान आहे. पुण्यातील कुमठेकर रोडवर खालकर तालिम आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट
अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान गोंधळ झाला. पृथ्वीराज मोहोळ याने पराभव केल्यानंतर शिवराज राक्षेने पंचावर पराभवाचं खापर फोडलं. त्याला लाथ मारल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ झाला. यानंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं. गादी गटातून पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेने पंचाची कॉलर पकडत जोरात लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलंय. या घटनेनंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये काका पवार यांच्या दोन्ही मल्लांनी केलेल्या कृत्यामुळे कुस्ती शौकनांची मात्र नाराजी झाली.
माझी पाठ टेकलेली असेल तर पराभव मान्य करतो : राक्षे
पंचांनी आमच्यावर अन्याय केला, पंचांचा निर्णय चुकीचा आहे, असा आरोप शिवराज राक्षेने केला. माझी पाठ टेकलीच नाही असा दावाही शिवराज राक्षेने केला. तसंच सामन्याचा रिप्ले दाखवा अशी मागणी शिवराज राक्षेने केली. माझी पाठ टेकलेली असेल तर पराभव मान्य करतो, असे राक्षे म्हणाला.