पुण्यातील शाळेत चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समार आला आहे. पुण्यातील पाषाण भागातील नामांकित शाळेत ही घटना घडली. शाळेतील शिपायानेच व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याच समोर आलं आहेशाळेतील किचनरूममध्ये ड्रेस चेंज करायला आलेल्या विद्यार्थिनींचे तो व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होता. याप्रकरणी चतुशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शाळेतील शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ६ जानेवारी रोजी घडला. शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी शाळेत असणाऱ्या किचन रूममध्ये ड्रेस चेंज करायला गेल्या होत्या. तिथे शाळेतील शिपाई तुषार सरोदे हा उपस्थितीत होता. विद्यार्थीनींनी त्याला तिथून जायला सांगितले असता त्याने त्याचा मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेऊन रूममध्ये असलेल्या एका स्विच बोर्डवर ठेवला.
दरम्यान, हा सगळा प्रकार विद्यार्थिनींना लक्षात आला आणि त्यांनी तात्काळ व्हिडीओ मोबाईलमधून डिलीट केला. घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थिनींनी घरी गेल्यावर आपल्या पालकांना सांगितला तेव्हा त्यांना धक्का बसला. पालकांनी शाळेतील मुख्यधापिका यांची भेट घेतली आणि तक्रार केली. यावेळी त्यांनी शिपाई तुषार सरोदे याला विचारले असता त्याने या प्रकरणाला नकार दिला.
मात्र हा प्रकार जेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाला कळला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सरोदे याची चौकशी केली असता त्याने त्याचा मोबाईल रेकॉर्डिंगसाठी ठेवला असल्याची कबुली दिली. यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीच्या विरोधात पोक्सो सह बी. एन. एस कलम ७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.