कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येचा एका वर्षाच्या आत बदला घेण्याचा इरादा असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मोहोळ हत्येचा बदला घेण्यासाठी दोन जण मध्य प्रदेशातून पिस्तुल घेऊन आले होते. मोहोळ टोळीच्या या दोघांनाही अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. शरद मालपोटे आणि संदेश कडू असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली आहे.
5 जानेवारी 2024 ला शरद मोहोळ याची हत्या करण्यात आली होती. शरद मोहोळच्या घराजवळच कोथरूडच्या सुतारदरा भागात शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात शरद मोहोळचा मृत्यू झाला होता.
शरद मोहोळ याच्यावर 5 जानेवारी 2024 ला त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच गोळीबार करण्यात आला. शरद मोहोळचाच साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी हा गोळीबार केला. शरद मोहोळचा खून करणारा मुन्ना कोळेकर महिन्याभरापासून शरद मोहोळकडेच काम करत होता. टोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्या सोबत होता.
सखोल तपास केल्यानंतर शरद मोहोळची हत्या वर्चस्ववादातून झाल्याचं समोर आलं. मुळशीमधील विठ्ठल शेलार टोळीने शरद मोहोळची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. याप्रकरणी पोलिसांनी विठ्ठल शेलार याच्यासह 17 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली.