- एनसीआर भागात BS4 वाहनांच्या प्रवेशावर बंदीमुळे ट्रकभाड्यात घसरण आणि त्यामुळे मालवाहतूक खर्चात वाढ
- महाराष्ट्रातील मतदानामुळे मालवाहतूकीच्या धंद्यात घट
- गत महिन्याच्या तुलनेत दुचाकी वाहनांच्या विक्रीत 27% वाढ
- उत्तम मॉन्सून आणि रब्बी हंगामात चांगल्या उत्पादनाच्या आशेने गत महिन्याच्या तुलनेत कृषी ट्रॅक्टरच्या विक्रीत जोरदार वाढ
- सणासुदीनंतर कार विक्रीत मोठ्या प्रमाणात घसरण
- इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत घसरण सुरुच
पुणे : सणासुदीच्या हंगामानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये सामान्य पातळीवर स्थिरावलेल्या ट्रकभाड्यात नोव्हेंबर 2024 मध्ये, बहुतांश ट्रक मार्गांवर परिवहन सेवांची मागणी कमी झाल्यामुळे, ट्रकभाड्यात मोठी घट झाली. गत महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर २०२४ मध्ये मालवाहतूक वाहनांच्या ताफ्याच्या वापरात सुमारे 60% पर्यंत घसरण नोंदविली गेली आहे. या घसरणीमागे वाहनांच्या विविध श्रेणीत अतिशय अल्प मागणी, वायू प्रदूषणाच्या समस्यांमुळे एनसीआर प्रदेशात BS4 ट्रकवर बंदी, महाराष्ट्रातील मतदानाची प्रक्रिया आणि शेतमाल उत्पादनांच्या वाहतूकीत झालेली घट यासारखे अनेक घटक कारणीभूत आहेत.
मालवाहतूक क्षेत्रातील बहुतांश ट्रक्स हे BS4 निकषांचे पालन करणारे असून एनसीआर भागात त्यांच्या प्रवेशावर घालण्यात आलेल्या बंदीमुळे हे ट्रक मालाची एनसीआर प्रदेशाच्या सीमेपर्यंतच वाहतूक करत आहेत. तेथे या ट्रक्समधील माल छोट्या आकाराच्या BS6 अथवा सीएनजी ट्रकमध्ये चढविला जातो आणि एनसीआर विभागाच्या आतील भागात पोहचविला जातो. यामुळे एनसीआर प्रदेशात मालवाहतूकीच्या खर्चात वाढ झाली आहे. ट्रकभाड्यांच्या दरावर परिणाम होण्याचे आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्रात नुकतीच पार पडलेली मतदान प्रक्रिया आहे. मतदान प्रक्रियेमुळे मालवाहतूकीच्या कामकाजाचा वेग मंदावल्याने ट्रकच्या भाडेदरात (वक्राकार फेऱ्या) घसरण झाली आहे. दिल्ली-चेन्नई-दिल्ली आणि दिल्ली-बंगळूर-दिल्ली यासारख्या मार्गांवर ट्रकभाडेदरात गत महिन्याच्या (महिना-दर-महिना) तुलनेत अनुक्रमे 1.4% आणि 1% घसरण झाली आहे.
वाय. एस. चक्रवर्ती, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीराम फायनान्स लिमिटेड म्हणाले, “दळणवळण क्षेत्रात सणासुदीच्या हंगामाबद्दलचा उत्साह मावळला आहे. GDP मध्ये 60% वाटा असलेले खासगी उपभोग क्षेत्र 6% ने वाढले असले तरी पहिल्या तिमाहीतील 7.4% वाढीच्या तुलनेत त्यात घसरण झालेली आहे. ग्रामीण भागात मागणीत पुन्हा वाढ सुरु झाली असली तरी शहरी भागात वस्तूंच्या उपभोगात झालेली घट, अन्नदराने मारलेली उसळी, महागलेले कर्ज आणि वास्तविक वेतनात अल्प वाढ यामुळे खासगी उपभोग क्षेत्रात घट दिसून आलेली आहे. BS4 वाहनांवरील बंदीमुळे एनसीआर भागात ट्रक व्यवसाय जवळपास ठप्प झाला होता. मालवाहतूक वाहनांच्या ताफ्याचा वापरसुध्दा 60% च्या नव्या तळपातळीवर येऊन ठेपला होता. शेतमाल उत्पादनात जुलै-सप्टेंबरमध्ये वार्षिक 3.5% वाढ झाली असून ती गत तिमाहीतील 2% वाढीपेक्षा अधिक आहे जो एकमेव आशादायक बिंदू ठरला.”
नोव्हेंबर 2024 मध्ये दुचाकी वाहनांच्या विक्रीत महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर 27% वाढ झाली. दिवाळी ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी असल्याने, दिवाळीच्या दिवशी झालेली विक्री नोव्हेंबरच्या विक्रीत मोजली गेली असल्यामुळे ह्या महिन्यात ही वाढ दिसत आहे. दुचाकी वाहनांच्या व्यतिरिक्त, इतर सर्व वाहन प्रकारानंपैकी, फक्त कृषी ट्रॅक्टर मध्ये वाढ दिसली ज्यात महिना-दर-महिना आधारावर 29% वाढ दिसून अली. चांगल्या पावसानंतर डिसेंबर/जानेवारीमध्ये आगामी रब्बी हंगामासह चांगल्या कृषी उत्पादनाची अपेक्षा हे ट्रॅक्टर विक्रीतील या लक्षणीय वाढीचे कारण असू शकते.
प्रवासी वाहनांच्या विक्रीबाबतच्या बातम्या मात्र फारशा उत्साहवर्धक नाहीत. गत महिन्याच्या तुलनेत कार विक्रीत 36% घसरण झाली आहे. कार उत्पादकांनी सणासुदीसाठीच्या सवलत योजना काढून घेतल्याने ही घसरण असू शकते. त्याचप्रमाणे व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतसुध्दा तीव्र घसरण झाली असून बसेसची विक्री तब्बल 32% घसरली आहे.
इलेक्ट्रीक वाहनांच्या (दोन, तीन आणि चारचाकी) च्या विक्रीत घट होत राहिली, ऑक्टोबर महिन्याचा अपवाद वगळता जेथे सणासुदीच्या ऑफरने विक्रीला काही प्रमाणात चालना दिली. महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर ईव्ही कारच्या विक्रीत 38% ने घट झाली आहे, तर दुचाकी ईव्हीच्या विक्रीत महिन्या-दर-महिन्याच्या आधारावर 19% ने घट झाली आहे. नवीन दुचाकी आणि चार चाकी ईव्हीच्या आगामी लॉन्चमुळे येत्या काही महिन्यांत विक्री वाढण्यास मदत होईल का हे पाहणे बाकी आहे.
इंधन खपाच्या बाबतीत डिझेलच्या वापरात नोव्हेंबर २०२४ मध्ये गत महिन्याच्या तुलनेत 7% वाढ झाली आहे, तर पेट्रोलच्या खपात 0.3% वाढ झाली आहे. दरम्यान, फास्टटॅगच्या संकलनात मासिक आधारावर 4% वाढ दिसून आली असून ही वाढ वाहतूकीचे प्रमाण वाढल्याचे दर्शवत आहे. तसेच एकूण टोल संकलन गतमहिन्याच्या तुलनेत 0.7% घटल्याचे दर्शवत असले तरी ही घट छोट्या अंतरावरील सहली किंवा लहान वाहनांच्या वापरामुळे मोठ्या वाहनांच्या तुलनेत द्यावा लागणाऱ्या कमी टोल दरामुळे असू शकते.