तिकिटासाठी घरातच 2 पक्ष, वडील एका पक्षात मुलगा दुसऱ्या पक्षात

0

महायुती आणि महाविकास आघाडीतल्या तिकीटांच्या समीकरणामुळं आता घरांतही 2-2 पक्ष झाल्याचं दिसतंय. नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. कुडाळमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार आहेत. नारायण राणे भाजपचे खासदार, नितेश राणे भाजपचे आमदार आहेत. वडील आणि भाऊ भाजपात असले तरी तिकीटासाठी निलेश राणे बंड करुन शिंदेंच्या शिवसेनेत जात आहेत. महायुतीत कुडाळ-मालवणची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळं निलेश राणेंनी धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईकांशी निलेश राणेंची लढत होईल.

इकडे नवी मुंबईतही भाजपला गणेश नाईकांच्या घरातूनच धक्का बसलाय. नाईकांचे पुत्र, संदीप नाईकांनी 28 माजी नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. गणेश नाईकांना ऐरोलीतून विधानसभेचं तिकीट दिलंय. मात्र बेलापूरमधून भाजपनं तिकीट न दिल्यानं, संदीप नाईकांनी तुतारीवर लढण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

आता बेलापूरमध्ये भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून संदीप नाईक अशी थेट लढत होईल. गणेश नाईक 2019 पर्यंत राष्ट्रवादीतच होते. 2019 मध्ये ते भाजपात आले. मात्र आता वडील भाजपात आणि मुलगा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अशी स्थिती निर्माण झालीये. पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताच संदीप नाईकांनी बेलापूरच्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंवर निशाणा साधला.

आता प्रश्न हा आहे की, गणेश नाईकांवर भाजप कारवाई करणार का ? नाईकांबद्दल काय करायचं हे भाजपनं ठरवावं, असं शिंदेंच्या शिवसेनेनं म्हटलंय. निलेश राणेंसारखंच धनंजय महाडिकांच्या घरात होण्याची शक्यता आहे. धनंजय महाडिक, भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक कोल्हापूर उत्तरमधून इच्छुक आहेत. मात्र महायुतीत जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे असून राजेश क्षीरसागर शर्यतीत आहेत.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

त्यासाठीच धनंजय महाडिकांनी आधी फडणवीस आणि नंतर शिंदेंच्या शिवसेनेची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रातल्या एका मंत्र्यांचेही धनंजय महाडिकांच्या मुलाला तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न सुरु आहे. पण शिंदेंनी कोल्हापूर उत्तरची जागा न सोडल्यास कृष्णराज महाडिक धनुष्यबाणावर लढू शकतात.

भाजपात नेत्यांच्या घरात जसं घडतंय, तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही होताना दिसतंय. छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. पण हा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळं शरद पवार गटाकडे जागा न सुटल्यास ठाकरेंच्या शिवसेनेतही समीर भुजबळ प्रवेश करु शकतात. समीर भुजबळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खुद्द भुजबळांनीच संकेतही दिले होते.

नांदगाव – मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी मनापासून सदिच्छा, असं शुभेच्छा देणारं ट्विट भुजबळांनी केलं होतं. समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहे. मात्र महायुतीत नांदगाव मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे असून सुहास कांदे आमदार आहेत. त्यामुळं नांदगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळांचा सामना निश्चित मानला जातोय. फक्त तुतारी की मशाल एवढंच ठरायचं आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

दुसरीकडे अजित पवारांनीच समीर भुजबळांचा राजीनामा मागितल्याची सूत्रांची माहिती आहे. समीर भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आहे. इकडे बीडमध्ये भाजपला झटका बसलाय. बीडमधून इच्छूक असलेले पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्केंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. बीडची जागा, महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. मात्र म्हस्के तुतारी हाती घेतली असली तरी बीडमधून ज्योती मेंटेना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं तिकीट निश्चित आहे. असं असतानाही राजेंद्र म्हस्केंनी पवारांच्या राष्ट्रवादीचं काम करण्याचा निर्णय घेतला.