आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोण सत्तेत येईल हे आता सांगता येणं कठीण आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच मोठा डाव टाकत महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित आणि तितकाच बहुचर्चित राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आजच लागण्याची दाट शक्यता आहे. त्याच धर्तीवर आता राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीच्या हालचालींना वेग आला आहे.






विशेष म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महायुतीकडून 12 पैकी 7 जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. यात भाजपकडून 3, शिवसेनेकडून 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 अशा एकूण 7 जणांच्या नावांचा प्रस्ताव राज्यपालांना पाठवण्यात आला आहे.
गेल्या पाच वर्षापासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा कायम आहे. पण येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परत एकदा महायुती सरकारने सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आलेली यादी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवण्यात आलेली आहे. यात भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि बाबूसिंग राठोड बंजारा समाजाचे धर्मगुरू आहेत, त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच शिवसेनेकडून मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील यांची नावांची चर्चा आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं होतं. तत्कालीन मविआ सरकारकडून 2020 मध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे 12 जणांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. मात्र, त्यांनी सरकारच्या शिफारसीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर जून 2022 मध्ये शिवसेनेतील बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं अन् महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत आलं. तेव्हापासून आजतागायत अनेकवेळा चर्चेत येऊनही राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबितच राहिला.
आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोण सत्तेत येईल हे आता सांगता येणं कठीण आहे. त्याचमुळे निवडणुकीच्या आधीच मोठा डाव टाकत महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.











