महाविद्यालयात हेलपाटे न मारता अकरावी प्रवेश! प्रवेशासाठी लागतील 5 कागदपत्रे, अर्ज करताना विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ 4 बाबी

0
2

राज्यभर यंदा पहिल्यांदाच इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना घरबसल्या अर्ज करता येणार आहेत. त्यांना एकूण दहा महाविद्यालयांची निवड पसंतीक्रमाने करावी लागणार असून, त्यानुसार त्यांना तीन प्रवेश फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळणार आहे. अकरावी प्रवेशावेळी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत नियमित बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा बैठक क्रमांक टाकल्यावर त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप येईल. आपोआप माहिती न येणाऱ्यांनी स्वत: माहिती भरायची आहे. मोबाईल ॲपमधूनही विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येणार आहे. अर्ज दोन भागात असून, अर्जातील भाग-एक भरल्यावर (स्वत:चे व आईचे नाव, जन्मतारीख, जातप्रवर्ग, आरक्षण) ऑनलाइन शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे (एक एमबीपेक्षा जास्त आकार नसावा) अपलोड करावीत. अर्ज लॉक करण्यापूर्वी तो प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्राची मदत घ्यावी.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

अर्जाचा भाग-एक भरल्यावर डॅशबोर्ड तपासा, तेथे अर्ज व्हेरिफाइड असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी अर्जाप्रमाणे म्हणजे व्हेरिफाय करून घेणार नाहीत, त्यांचा अर्ज अपूर्ण राहील व तो प्रवेश प्रक्रियेतून बाद ठरेल. प्रवेशाच्या तीन प्रमुख फेऱ्या असतील, आवश्यकता भासल्यास विशेष फेरी जाहीर होईल.

प्रवेशासाठी लागतील ‘ही’ कागदपत्रे

दहावीच्या परीक्षेचे मूळ गुणपत्रक

दहावीच्या वर्गातून शाळा सोडल्याचा दाखला

आधार कार्ड (छायांकित प्रत)

दोन पासपोर्ट साइज फोटो

सामाजिक आरक्षणातून प्रवेश घेणाऱ्यांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला

विद्यार्थ्यांनो, ‘या’ बाबी लक्षात ठेवाच

(१) विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी दिलेल्या संकेतसस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. केंद्रीय प्रवेशाच्या कॅप जागांशिवाय संस्थांअंतर्गत इन हाउस कोटा, व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्याक शाळांमधील कोटा राखीव असेल. राखीव जागांवर पूर्ण प्रवेश न झाल्यास शिल्लक जागांवर खुल्या प्रवर्गातून प्रवेश दिले जातील.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

(२) खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५५ टक्के, तर उर्वरित ४५ टक्के जागांवर सर्व जातसंवर्गातील विद्यार्थ्यांना मिळतील प्रवेश. नियमानुसारच प्रवेशासाठीचे शैक्षणिक शुल्क शिक्षण संस्थांकडून घेतले जाईल. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पारदर्शक होणार असून, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.

(३) प्रवेश अर्ज दोन भागात भरायचा असून भाग- एकमध्ये विद्यार्थ्यांनी स्वत:ची माहिती भरून अर्ज प्रमाणित करून घ्यावा. अर्जाच्या भाग-दोनमध्ये १० महाविद्यालयांच्या सांकेतिक क्रमांकानुसार पसंतीक्रम निवडावेत. अर्ज भरून झाल्यावर तो ‘सबमिट’ करावा.

(४) प्रवेश फेरीनंतर प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्यांनी मूळ कागदपत्रे देऊन प्रवेश निश्चित करावा. तरीदेखील प्रवेश न घेतल्यास तो विद्यार्थी पुढील प्रवेश फेरीसाठी पात्र नसेल. त्याला ऑनलाइन संमती नोंदवून विशेष फेऱ्यांमध्ये सहभागी होता येईल.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश अशक्य 

जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचे अकरावी प्रवेश ऑनलाइनच होतील. तीनवेळा प्राचार्यांना त्यासंदर्भात माहिती दिली असून, आता महाविद्यालयांचे रजिस्ट्रेशन होईल. ऑनलाइन प्रवेशामुळे क्षमतेपेक्षा जास्त एकाही विद्यार्थ्यास प्रवेश देता येणार नाही.

– सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर