फडणवीस यांच्या खास मंत्र्याला ‘वाढदिवशी’च डिवचलं? विरोधातील बॅनरबाजीमुळे बॅनर छापणाऱ्यावर गुन्हा दाखल

0
1

सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांचा आज (20 सप्टेंबर) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या आधीच डोंबिवलीत ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. त्यामुळे डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. हे बॅनर छापणाऱ्या जॉली प्रिंटरच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कोणाच्या सांगण्यावरुन हे बॅनर लावण्यात आले, याचा तपास विष्णूनगर पोलिसांनी सुरु केला आहे.

हे बॅनर शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याकडून लावल्याची चर्चा आहे सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपास करीत आहेत. त्यांच्या तपासानंतर हे बॅनर कुणी लावले त्याचा खुलासा होणार आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद आत्ता विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

गेल्या दीड वर्षापासून कल्याण डोंबिवलीतील चारही विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद सुरु आहे. लोकसभा निवडणूकी दरम्यान दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना समज दिली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी एकत्रित येऊन महायुतीत काम करण्याचे आदेश दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना दिले होते.

लोकसभा निवडणूक संपली. विधानसभेची तयारी सुरु झाली. मात्र विधानसभेसाठी अनेक जण इच्छूक आहेत. या चार जांगापैकी दोन जागा भाजपकडे, एक शिवसेना शिंदे गटाकडे, एक मनसेकडे आहे. भाजप तर आपली जागा सोडणार नाही. आत्ता भाजपच्या आमदार असलेल्या विधानसभा मतदार संघातील शिंदे गटाच्या इच्छुकांनी काय करायचे हा सवाल त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात तणाव वाढला आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

रविंद्र चव्हाण यांचा आज वाढदिवस असल्याने अनेक ठिकाणी त्यांचे समर्थकांनी बॅनर लावले आहे. त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र डोंबिवली पश्चिमेत काही ठिकाणी त्यांच्यावर टीका करणारे बॅनर लावण्यात आले. विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या एका पदाधिकाऱ्याने रविंद्र चव्हाण यांना डिवचणारे बॅनर शहरात लावले, अशी माहिती समजतीय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे बॅनर डोंबिवली पश्चिमेतील सध्या शिवसेना शिंदे गटात असलेल्या पदाधिकाऱ्याने लावले आहेत. आता या बॅनरबाजीला भाजपा काय उत्तर देणार? पोलीस काय कारवाई करणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.