विशाळगड अतिक्रमण शिवभक्तांची तोडफोड; संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही कारवाई?

0

राज्याच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान असलेल्या विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणांचा वाद मागच्या काही दिवसांपासून धुमसत आहे. या अतिक्रमणांविरोधात कोल्हापुरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी विशाळगडाच्या दिशेने कूच करण्याचा इशाराही दिला होता. यादरम्यान, रविवारी विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात आक्रमक होत काही शिवभक्तांनी तोडफोड केली होती.

त्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुमारे ५०० हून अधिक शिवप्रेमींविरोधात गुन्हे दाखल केले होते. तसेच काहींची धरपकडही केली होती. पोलीस आणि प्रशासनाकडून झालेल्या या कारवाईविरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती हे शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

याबाबत सोशल मीडियावरून दिलेल्या प्रतिक्रियेत संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, काल विशाळगड येथे झालेल्या प्रकरणानंतर पोलिसांनी शिवभक्तांची धरपकड सुरू केलेली आहे. काही शिवभक्तांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकीवर पडदा टाकण्यासाठी व स्वतःचा बेजबाबदारपणा लपविण्यासाठी जाणीवपूर्वक शिवभक्तांना लक्ष्य करत आहे. मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असून मी स्वतः शाहूवाडी पोलिस स्टेशन येथे हजर होण्यास जात आहे. सर्वांनी संयम बाळगावा व कायद्याचा सन्मान राखावा, असं आवाहनही संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

त्यानंतर संभाजीराजे छत्रपती हे शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी शिवभक्तांवर केलेल्या कारवाईबाबत पोलिसांसोबत चर्चा केली. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यावरही कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती