एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, राज्यात 5 जोड्या; भाऊ-भाऊ भाऊ बहीणही विधानसभेत

0

राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा घराणेशाहीचा साक्षात्कार पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे एकीकडे घराणेशाहीच्या मुद्दयावरुन नेहमीच टीका करणाऱ्या मतदारांनी, नागरिकांनीही या घराणेशाहीला पाठबळ दिल्याचं निवडणूक निकालानंतर पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश मतदारसंघात नात्यागोत्यांचा गोतावळा दिसत असून अनेकजण विजयी देखील झाले आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत सध्या खासदार असलेल्यांची मुलेही निवडणुकीच्या रिंगणात होती, त्यामुळे वडिल खासदार आणि मुलगा आमदार अशाही अनेक जोड्या आहेत. त्यामध्ये कोकणातून राणे कुटुंबीय, मराठवाड्यात चव्हाण आणि भुमरे कुटुंबीय, ठाण्यातील शिंदे कुटुंबीय, बारामतीत पवार कुटुंबीय, मुंबईत गायकवाड कुटुंबीयांमध्ये एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी पाहायला मिळत आहे. त्यामुळे, निवडणूक मतमोजणीनंतर नव्या विधानसभेतल्या नातेसंबंधाचा एक विरळाच योगायोग साधला जात असल्याचे दिसून येते.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

लोकसभा निवडणुकीत 6 महिन्यांपूर्वीच खासदार बनलेल्या काही नेत्यांची घरातील मंडळीच आता विधानसभेत आमदार बनल्याचं चित्र आहे.  यंदाच्या निवडणुकांवेळी विधानसभेसाठी भाऊ-भाऊ, बहीण-भाऊ, दोन मावसभाऊ अशा जोड्या तयार झाल्याचं पाहायला मिळालं.

एकाच कुटुंबातील खासदार-आमदार 5 जोड्या

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दोन्ही मुले विधानसभेच्या रिंगणात होती. या दोन्ही मुलांनी विधानसभा निवडणूक जिंकल्याने ते आमदार बनले आहेत. त्यामुळे, एकाच घरात वडील खासदार आणि दोन्ही मुले आमदार आहेत.

मुंबईत मोठी बहीण खासदार तर धाकटी आमदार असा योग साधलाय. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड धारावीतून लोकसभा खासदार बनल्या आहेत. त्यानंतर, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची लहान बहीण ज्योती गायकवाड यांनी विजय मिळवत त्या आमदार बनल्या आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

नांदेडमधून वडिल राज्यसभेत आणि मुलगी विधानसभेत अशी किमया साधलीय ती माजी मुख्यमंत्री आणि खा. अशोक चव्हाण यांनी. कारण, मुलगी श्रीजया चव्हाण या निवडणुकीतून आमदार बनल्या आहेत. त्यामुळे, एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी नांदत आहे.

बारामतीधून पत्नी राज्यसभा सदस्य आणि पती विधानसभेत आमदार, उपमुख्यमंत्री असा योगायोग साधलाय सुनेत्रा पवार आणि दस्तुरखुद्द अजित पवार यांनी.

भाऊबंदकी विधानसभेत

अजित पवारांनी त्यांच्या एका पुतण्याला पराभूत केलं असलं तरी त्यांचा दुसरा पुतण्या कर्जत-जामखेडमधून विधानसभा सभागृहात दाखल झाला आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आमदार बनून विधानसभेत पोहोचले आहेत. तत्पूर्वी लोकसभेत त्यांचे चिरंजीव हे तिसऱ्यांदा खासदार बनले आहेत. त्यामुळे, एकनाथ शिंदेंच्या घरात आमदारकी आणि खासदारकी आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई दोघेही विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे, येथेही नात्यागोत्यांची घराणेशाही दिसून येते.

निवडणुकीच्या अभूतपूर्व निकालानंतर काही योगायोग होता होता राहिले आहेत. त्यामध्ये लातूरमधून दोन सख्खे भाऊ आधीच्या विधानसभेत होते, यावेळी देशमुखबंधूपैकी धीरजचा पराभव झाला आणि दोन भावांच्या दुसऱ्या जोडीला विधानसभेत जाता आलं नाही.

माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे स्वतः लोकसभेला पराभूत झाले असले तरी त्यांची दोन्ही मुले आमदार बनली आहेत. मुलगा संतोष दानवे आणि कन्या संजना जाधव निवडणुकीत विजयी होऊन विधानसभेत दाखल होत आहेत.