पुणे शहर 8 जागा १४ इच्छुकांचे काँग्रेसपक्षाकडे अर्ज; पर्वती हडपसर या मतदारसंघांवरही दावा करण्याचा निर्णय

0

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पाच विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसने दावा सांगितला आहे. दरम्यान, शहरातील आठ जागांसाठी १४ इच्छुकांनी आत्तापर्यंत पक्षाकडे अर्ज केला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूकही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढवण्याचा निर्णय तिन्ही पक्षांनी घेतला आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. परंतु आघाडीतील तिन्ही पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांनी यापूर्वी शहरातील सर्व जागांवर दावा केला आहे. या पाठोपाठ काँग्रेसने आता शहरातील आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. ९) साप्ताहिक बैठक झाली. त्यामध्ये पाच जागांवर दावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहे. तर मागील विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या दोन्ही मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला होता.

त्यामुळे या तिन्ही मतदारसंघांबरोबरच पर्वती आणि हडपसर या दोन्ही मतदारसंघांवरही दावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, असे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून पक्षाने अर्ज मागविले होते. आतापर्यंत पक्षाकडे १४ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.