पुणे पोर्श अपघाताचे प्रकरण ताजे असताना पुन्हा ‘हिट ॲण्ड रन’ घटनेने पुणे हादरले आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात अज्ञात वाहनाने रविवारी मध्यरात्री दुचाकीवरील दोन पोलिस मार्शलला उडवले. एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






एच.सी. कोळी असे मृत्यू झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. पोलिस अंमलदार संजोग शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत.पुण्यात कल्यानीनगर, गंगा धाम चौकात झालेला अपघात, त्यानंतर ड्युटीवर असलेल्या पोलिसांसोबतच हिट अँड रनची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच खडकी पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या भागात सीसीटीव्ही नसल्याने ते वाहन कोणते याचाही अंदाज पोलिसांना येत नसल्याचे दिसत आहे. त्या वाहनाचा शोध घेण्यासाशी पोलिस पथक रवाना झाले आहे.
खडकी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले शिंदे व कोळी हे रविवारी मार्शल ड्युटीवर होते. बोपोडी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना बोपोडी चौकातून ते रेल्वे ब्रिजच्या येथून जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना पाठीमागून उडवले. यामध्ये दोघे खाली कोसळून गंभीर जखमी झाले. त्यात गंभीर मार लागल्याने कोळी यांचा मृत्यू झाला. शिंदे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.











