पुण्यामध्ये जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात एका अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना उडवल्याची घटना रविवारी घडली होती. या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. याअपघाताअगोदर या पोलीस कर्मचाऱ्यांनी एका हरवलेल्या मुलीला तिच्या आईवडिलांकडे सोपवलं होतं. त्याचा फोटो समोर आलाय.






पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात
पोलीस कर्मचारी समाधान कोळी यांचा शेवटचा फोटो समोर आलाय. खडकी भागात झालेल्या अपघातात खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कोळी यांचा मृत्यू झालाय. रविवारी मध्यरात्री पोलीस कर्मचारी समाधान कोळी आणि पी.सी शिंदे हे बीट मार्शल म्हणून गस्तीवर होते. त्यांनी हॅरिस ब्रीज बोपोडीजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली होती.
शेवटचा फोटो समोर
त्यांच्या मृत्युअगोदरचा एक फोटो समोर आलाय. हा फोटो एक वाजून सात मिनीटांचा आहे. गस्तीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल समाधान कोळी आणि पीसी शिंदे यांना खडकी भागातील बस स्टॉपवर मध्यरात्री एक अकरा वर्षांची मुलगी आढळून आली होती. या दोघांनी तिच्याकडून आई वडीलांचा नंबर घेतला होता. ती पिंपळे सौदागर भागात राहात असल्याचं तिने सांगितलं.
पुण्यात हिट अॅण्ड रन
त्यानंतर त्यांनी या मुलीच्या आईवडिलांना बोलावलं होतं. खातरजमा करून मुलीला त्यांच्याकडे सोपवलं. तसा फोटो पोलीस कॉन्स्टेबल समाधान कोळी आणि पीसी शिंदे यांनी पोलिसांच्या गृपवर पोस्ट केला होता. यानंतर दोघे खडकी बाजार भागात आले. तिथून बोपोडी भागात आले असताना एक वाजून छत्तीस मिनिटांनी अपघात झाला. त्यातच समाधान कोळी यांचा मृत्यू झालाय.










