400 पार सोडा, 300 पारही नाही; ‘या’ पाच राज्यांनी भाजपचा खेळ बिघडवला

0
1

लोकसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. या कलानुसार भाजपच्या नेतृत्वातील एनडीए 291 जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी 233 जागांवर आघाडीवर आहे. इंडिया आघाडीने अपक्षेपेक्षा मोठी उसळी घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. या कलानुसार इंडिया आघाडीची कामगिरी अत्यंत चांगली झालेली दिसत आहे. तर भाजपची कामगिरी सुमार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट ओसरल्याचंही या कलांमधून स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे ज्या पाच राज्यांवर भाजपची मदार होती, त्याच बालेकिल्ल्यात भाजपला मोठा सुरुंग बसला आहे.

भाजपला उत्तर प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणात मोठा फटका बसला आहे. उत्तर प्रदेशातील 80 जागांपैकी केवळ 35 जागांवर भाजपला विजय मिळताना दिसत आहे. तर समाजवादी पार्टी 34 आणि काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात राम मंदिर उभारल्यानंतर मोदी सरकारला मोठा फायदा होईल असं चित्र होतं. पण भाजपचा हा बालेकिल्लाच ढासळला आहे. त्यामुळे भाजपसाठी ही मोठी धोक्याची घंटी असल्याचं सांगितलं जात आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

सोयाबीन, शेतकऱ्यांचा प्रश्न भोवला
हरियाणात भाजपला अवघ्या चार जागा मिळताना दिसत आहे. तर काँग्रेसला 6 जागा मिळताना दिसत आहेत. हरियाणा हा सुद्धा भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र, पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन आणि सोयबीनच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं भाजपला भोवल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या या निगरगट्ट भूमिकेमुळेच भाजपचा पारंपारिक मतदार हा काँग्रेसकडे गेल्याचं सांगितलं जात आहे. पंजाबमध्ये तर भाजपला खातंही उघडता येणार नसल्याचं चित्र आहे.

रेवन्नामुळे घात झाला
कर्नाटकातही भाजपला मोठं नुकसान झालं आहे. कर्नाटकातील एकूण 28 जागा आहे. त्यापैकी 26 जागा भाजपने गेल्यावेळी जिंकल्या होत्या. पण यावेळी भाजपला मोठं नुकसान झालं आहे. केवळ 16 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर 10 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपची कर्नाटकात जेडीएससोबत युती होती. जेडीएसचे नेते प्रज्वल रेवन्ना यांच्यावर सेक्स स्कँडलचे आरोप आहेत. ऐन निवडणुकीत हे प्रकरण बाहेर आलं. त्यावर भाजपने पाहिजे तशी अॅक्शन घेतली नाही. त्यामुळेच भाजपला मोठं नुकसान सोसावं लागत असल्याचं सांगितलं जात आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

धाबे दणाणले
तेलंगणात एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी प्रत्येकी 8 जागांवर काँग्रेस आणि भाजप आघाडीवर आहे. मागच्यावेळी तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं होतं. त्यामुळे यावेळीही भाजपला चांगलं यश मिळेल असं सांगितलं जात होतं. पण प्रत्यक्षात वेगळाच निकाल येत असल्याने भाजपचे धाबे दणाणले आहेत.

महाराष्ट्राने नाकारलं
उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. महाराष्ट्रात 48 जागा आहेत. मागच्यावेळी त्यापैकी 22 जागांवर भाजपचा विजय झाला होता. मात्र, यावेळी भाजपला या जागाही टिकवता येतील की नाही अशी साशंकता आहे. कलानुसार महायुती 17 आणि महाविकास आघाडी 30 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 11, शिंदे गट 4 आणि अजितदादा गट एका जागेवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 11, ठाकरे गट 12 आणि शरद पवार गट 7 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्यानंतरही त्यांना त्याचा फायदा झाला नाही. उलट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती मिळाल्याचं चित्र सुरुवातीच्या कलांमध्ये दिसत आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती