महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक घडामोडी घडणार आहेत. कारण आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. “विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा शिंदे गटाला स्वतंत्रपणे लढण्यात सांगेल तर अजित पवार गटालाही स्वतंत्रपणे लढण्यात सांगेल, अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणूक झाली की पुन्हा सर्व एकत्र येऊ, असं सुद्धा भाजपकडून शिंदे गट आणि अजित पवार गटाला सांगितलं जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप येणाऱ्या काळात शिंदे गट आणि अजित पवार गटाला विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढायला लावणार, अशी बाहेर चर्चा आहे”, असा मोठा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत.






या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात काय-काय मोठ्या घडामोडी घडणार? याबाबत मोठे दावे केले आहेत. त्यामुळे आगामी काळातील घडामोडी महत्त्वाच्या असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्यानुसार आगामी काळात महायुतीमधील तीनही घटक पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळातील घडामोडी जास्त महत्त्वाच्या असल्याचं स्पष्ट होत आहे.
अजित पवार गटातील आमदार पुन्हा शरद पवार गटात जाणार?
अनिल देशमुख यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. “लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्याकडे येण्यासाठी लाईन लागली आहे. अनेक जिल्ह्यातले अनेक नेते पवार यांच्याकडे यायला तयार आहेत. मात्र कुणाला घ्यायचे आणि कुणाला घ्यायचं नाही याचा निर्णय शरद पवार घेतील. आमचा तर आग्रह होता की, जे सोडून गेले त्यांना परत घेऊन नका. मात्र याबाबत वरिष्ठ नेते एकत्र बसून काय तो निर्णय घेतील”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
“राष्ट्रवादी शरद पवार गटात येण्यासाठी नेत्यांची मोठी रांग लागली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातले बरेच आमदार हे सुद्धा शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. त्यापैकी काहीतरी छोट्याशा कारणाने जे गेलेले आमदार असतील ते मोजकेच आमदार त्यांच्याबद्दलचा वरिष्ठ निर्णय घेतील. मात्र अजित पवार गटातले जे वरिष्ठ नेते असतील त्यांना कुणालाही घेणार नाही, असा आमच्या पक्षाचा निर्णय आहे”, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.











