लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात सपाटून मार खाल्लेल्या भाजप, राष्ट्रवादीला आता विधानसभा निवडणुकीच्या बांधणीसाठी मंत्रीमंडळ विस्ताराची गरज वाटू लागली आहे. दोन्ही पक्षांकडून मराठवाड्यात एकेक मंत्रीपद देण्याची शक्यता आहे.






लोकसभेला मराठवाड्यातून एकमेव विजयी झालेल्या महायुतीच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे यांचे मंत्रीपद मात्र मुंबईकडे देण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपकडून संभाजी पाटील निलंगेकर व राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांची नावे आघाडीवर आहेत. या दोघांसह भाजपचे राणा जगजीत सिंह पाटील व राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांच्या नावांचीही चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळविले. मराठवाड्यात तर महायुतीला केवळ एक जागा जिंकता आली. शिवसेनेचे संदीपान भुमरे छत्रपती संभाजी नगरमधून विजयी झाले. महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससकडून पराभवाचं विश्लेषणं केलं जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे ‘मराठा फॅक्टर’चा महायुतीला फटका बसला.
तसेच, पक्षांची फोडाफोड, भ्रष्टाराचे गंभीर आरोप असलेल्या नेत्यांना प्रवेश याचाही भाजपला फटका बसल्याचा पक्षातील धुरीणांचे विश्लेषण आहे. सर्व काही संपलेले असतानाही खचायचे नसते अशी उर्जा जेष्ठ नेते शरद पवारांमध्ये असल्याची तरुण व जेष्ठांमध्ये भावना दिसली. सर्वाचा परिपाक म्हणून महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळविले. दरम्यान, शिवसेनेला फोडल्यानंतर निर्विवाद बहुमत असतानाही राष्ट्रवादीतही भाजपने फुट पाडली.
समोरची आघाडी एकदमच कमकुवत असल्याने दीड वर्षांपासून मंत्रीपदे, विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्य, महामंडळे यांच्या नियुक्तीकडे कानाडोळा करणाऱ्या भाजप व महायुतीला आता मात्र विधानसभा निवडणुकीची धास्ती आहे. आता महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी महायुतीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यात मंत्रीमंडळ विस्तार आणि फेरबदल हे पहिले पाऊल असेल.
यात प्रामुख्याने भाजप व राष्ट्रवादीकडून मराठा नेत्यांची नावे संभाव्य मंत्रीपदासाठी आघाडीवर आहेत. भाजपकडून संभाजी पाटील निलंगेकर व राणा जगजीत सिंह पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. यात निलंगेकर यांचे नाव आघाडीवर असून मंत्रीपदाचा अनुभव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचा विजय, घटक पक्ष राष्ट्रवादीपेक्षा कमी असलेली ताकद यामुळे बीड जिल्ह्यातून सुरेश धस यांच्या नावाबाबतही पक्षात चर्चा होती. पंरतु, त्यांची लवकरच विधान परिषदेचा कालावधी संपत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश सोळंके व सतीश चव्हाण यांच्या नावाबाबत चाचपणी सुरु आहे. सोळंके यांच्यासाठी नुकतेच एक शिष्टमंडळ अजित पवारांना भेटले.
सोळंके पक्षाचे मराठवाड्यातील सर्वात जेष्ठ सदस्य आहेत. त्यांना मंत्रीपदाचाही अनुभव आहे. परंतु, पक्षात कृषीमंत्री धनंजय मुंडेंसारखा तगडा नेता असल्याने बीड जिल्ह्यात दुसऱ्या मंत्रीपदाची गरज नसल्याचा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे सतीश चव्हाण यांचे नाव पुढे आहे. तिसऱ्यांदा मराठवाडा पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या चव्हाण यांचा मराठवाड्यात राबता आहे. तसेच, छत्रपती संभाजी नगरमध्ये कमकुवत असलेल्या पक्षाला फायदा आणि अजित पवार यांचे विश्वासू या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.











