छत्रपती संभाजीनगरचे ‘पालकत्व’ महायुती मंत्र्यांची स्पर्धा; मुख्यमंत्री शिंदे या तरतूदीचा ‘आधार’ घेण्याची शक्यता

0

लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर संदीपान भुमरे यांनी आपल्या विधीमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भुमरे खासदार झाल्यामुळे सहाजिकच त्यांच्याकडे असलेले मंत्रीपद व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकत्व आपल्याला मिळावे यासाठी महायुतीच्या मंत्र्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.

शिवसेनेचे अब्दुल सत्तार, भाजपचे अतुल सावे या दोघांनी जाहीरपणे आपल्याला पालकमंत्री व्हायला आवडेल असे सांगत इच्छा व्यक्त केली आहे. तर शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांना आधी मंत्री आणि मग पालकमंत्री पदाची आशा आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात वेगळेच सुरू असल्याचे समजते. राज्यातील युती सरकारमध्ये रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री राहिलेले संदीपान भुमरे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडून आले आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

नियमाप्रमाणे खासदार पदाची शपथ घेण्यापुर्वी त्यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सहाजिकच त्यांचे मंत्रीपद आणि पालकमंत्री पद दुसऱ्याकडे द्यावे लागणार आहे. राज्यमंत्री मंडळाचा विस्तार झाला तर मंत्रीपदासाठी वेटींगवर असलेल्या संजय शिरसाट यांना संधी मिळू शकते. परंतु या सरकारचे शेवटचे पावसाळी अधिवेशन तीन दिवसांपुर्वी सुरू झाले आहे. मंत्रीमंडळ विस्तार अधिवेशनापुर्वी होईल असे बोलले जात होते, पण तसे काही झाले नाही.

आता विधानसभा निवडणुकीसाठी उरलेले चार महिने, त्याआधी लागू होणारी आचार संहिता पाहता जेमतेम दोन महिने सरकारच्या हाती असणार आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही, असे बोलले जाते. असे झाले तर विधिमंडळातील तरतूदीनुसार संदीपान भुमरे विधानसभेचे सदस्य नसले तरी सहा महिने मंत्रीपदावर कायम राहू शकतात.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊ शकते, त्यामुळे संदीपान भुमरे यांनाच पालकमंत्री पदावर कायम ठेवून यावरून सुरु असलेली स्पर्धा आणि रस्सीखेच टाळण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, भाजपचे अतुल सावे यांनी पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या नावाशिवाय शंभुराज देसाई व अन्य नावांवर खल सुरू असल्याचे बोलले जाते.

संभाजीनगरचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी मुख्यमंत्री शिंदे तुर्तास यावर काहीच बोलायला तयार नाहीत. त्यामुळे मंत्रीपदासाठी विधीमंडळ अधिवेशनात कोट घालून फिरणारे भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट यांचा जीव टांगणीला लागला आहे. तर इकडे संभाजीनगरात सत्तार-सावे यांना पालकमंत्री पद खुणावते आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता