लोकसभा निवडणूक 2024 च्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधी पंतप्रधान मोदींनी मुंबईत जाहीर सभा घेतली. मुंबईत येताच पंतप्रधान मोदींनी सगळ्या आधी शरद पवारांना जाहीर आव्हान दिलं. पाहा पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी हे सावरकरांचा वारंवार अपमान करतात. पण यापुढे ते आयुष्यात कधीही सावरकरांचा अपमान करणार नाही? हे शरद पवारांनी राहुल गांधींकडून वदवून घ्यावं.. असं म्हणत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांनाच चॅलेंज दिलं.






पाहा पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले…
“शिवतीर्थावरील या भूमीत बाळासाहेब ठाकरे आणि सावरकरांचा आवाज घुमला होता. आज विश्वासघाती आघाडीला बघून त्यांच्या आत्म्याला किती दुःख होत असेल. हे नकली शिवसेनेवाले. यांनी बाळासाहेबांना धोका दिला. यांनी शिवसेनेच्या बलिदानाला धोका दिला. सत्तेसाठी राम मंदिराला शिव्या देणाऱ्यांसोबत गेले. सत्तेसाठी मुंबई हल्ल्यानंतर पार्टी करणाऱ्या लोकांसोबत गेले. जी काँग्रेस दिवसरात्र सावरकरांना शिव्या देते, आज तिच्या कुशीत बसले आहेत.”
“आज मी एनसीपीच्या नेत्याला (शरद पवार) आव्हान देतोय की, त्यांनी राहुल गांधींकडून वचन घ्यावं की, आयुष्यात कधीही सावरकरांचा अपमान करणार नाही. आता त्यांनी निवडणुकीमुळे त्यांना गप्प केले आहे. त्यांच्याकडून हे वदवून घ्या एकदा. ते नाही करू शकत. कारण त्यांना माहिती निवडणुका संपताच पुन्हा सावरकरांना शिव्या द्यायला सुरू करणार आहेत.’
‘महाराष्ट्राच्या मातीचा विश्वासघात करणारे लोक. महाराष्ट्राच्या गौरवाला ठेच पोहचवणारे लोक. तोही एक काळ होता, जेव्हा शिवसेनेची ओळख घुसखोरांविरुद्ध उभी राहणारी अशी होती. आज तिच नकली शिवसेना सीएएचा विरोध करत आहे. त्यांना आता हिंदू, बौद्ध, जैन, शीख शरणार्थींना नागरिकत्व देण्यावरही आक्षेप आहे. भारतात असे मनपरिवर्तन कोणत्याही पक्षाचे झाले नाही, जसे नकली शिवसेनेचे झाले आहे.’
‘व्होट बँकेला खुश करण्यासाठी, धुव्रीकरणासाठी या पूर्ण आघाडीने संपूर्ण मुंबईला, देशाला धोका दिला. ज्याने कसाबने मुंबईला रक्तरंजित केले. त्याला हे लोक क्लिनचिट देत आहेत. हे आघाडीवाले पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. सैन्याला खोटं ठरवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचा यापेक्षा मोठा अपमान काय असेल. बाबासाहेबांचाही हे अपमान करत आहेत. बाबासाहेब आंबेडकर धर्मावर आधारित आरक्षणविरोधात होते. व्होट जिहाद करणाऱ्यांना हे आरक्षण देऊ इच्छित आहे.’ असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.











