लोकसभा धामधुमीत ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस; पण ठाकरेंनी …यामुळे दाखवली केराची टोपली!

0
1

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना आणि प्रचार शिगेला पोहोचलेला असताना उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. ठाकरेंनी मशाल या निवडणूक चिन्हासाठी तयार केलेले गीतातील काही शब्दावर आयोगाने बोट ठेवलं आहे. या गीतातील काही शब्द वगळण्यास आयोगाने सांगितले आहे, मात्र ठाकरेंनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आयोग विरुद्ध ठाकरे असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

उद्धव ठाकरे यांनी रविवारी (२१ एप्रिल) दुपारी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्या जुन्या भाषणाचे व्हिडीओही दाखवले आणि निवडणूक आयोगाला उलट सवाल केला. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ दाखवला, ज्यात ते प्रचारसभेत जय बजरंग बली असं म्हणत ईव्हीएमचे बटण दाबा असं सांगत आहेत. त्याचबरोबर अमित शाह यांचाही एक प्रचार सभेतील व्हिडीओ ठाकरेंनी दाखवला.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

या व्हिडीओत अमित शाह असं म्हणत आहेत की, ‘तुम्हा सगळ्यांना अयोध्येतील राम मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे ना? करायचं की नाही? करायचं आहे… मग खर्च होईल ना? पण, मी सांगतो की, नाही होणार. तुम्ही ३ डिसेंबरला भाजपचं सरकार निवडून द्या. भाजपचं मध्य प्रदेश सरकार सर्वांना मोफत रामलल्लाचे दर्शन घडवेल.’

हे दोन्ही व्हिडीओ दाखवत ठाकरे म्हणाले की, ‘यासंदर्भात आम्ही त्याचवेळी निवडणूक आयोगाकडे विचारणा केली होती. शिवसेनाप्रमुखांचा मतदान करण्याचा अधिकार अटलजी पंतप्रधान असताना काढून घेतला होता. त्यांना सहा वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी घातली होती. हिंदुत्वाचा प्रचार केल्याचा ठपका ठेवून निर्णय घेतला होता.’

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

ठाकरे पुढे म्हणाले की, “आपले पंतप्रधान आणि गृहमंत्री उघड उघड धार्मिक प्रचार करताहेत. आम्ही आयोगाला विचारलं होतं की, यांना काही सूट दिली आहे का? किंवा निवडणुकीच्या कायद्यात काही बदल केला आहे का?”, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

उद्धव ठाकरेंनी आयोगाला घेरलं

“आयोगाला आम्ही स्मरणपत्र दिलं होतं. तुम्ही उत्तर द्या किंवा उत्तर दिलं नाही, तर तुम्ही हा नियम बदलला आहे, असं गृहित धरून आम्ही देखील असा प्रचार केला, तर आमच्यावर कारवाई करता येणार नाही. अन्यथा जर नियम बदलला नसेल, तर यांच्यावर काय कारवाई केली? हे सांगा”, असे म्हणत ठाकरेंनी निवडणूक आयोगाला घेरलं.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

ठाकरे पुढे म्हणाले, “आमची निशाणी बदलली आहे. मशाल निशाणी आहे. निवडणूक म्हणून प्रेरणा गीत लागतं. पूर्वीचं आमचं गीत आहे. ते गीत आजही गावांत आणि खेड्यापाड्यात जनता आवडीने वाजवते, ऐकते. त्याप्रमाणे आम्ही मशाल गीत रिलीज केलं आहे.”

“निवडणूक आयोगाकडे हे गीत गेले, तेव्हा निवडणूक आयोगाने आम्हाला यातील दोन शब्द काढायला सांगितले आहेत. त्यामध्ये एक कडवे असे आहे की, ‘हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हे मर्म जीवन कर तू त्यास बहाल’ यातील हिंदू धर्म त्यांनी काढायला सांगितलं आहे”, अशी माहिती ठाकरेंनी दिली.