महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा आज अखेर सुटला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. यामध्ये जागाटपाचा फॉर्मुला अन् मतदारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरेंची शिवसेना 21, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. जागावाटपाची घोषणा झाली, पण सात जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरलेले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या 21 उमेदवारांची घोषणा याआधीच केली आहे. तर काँग्रेसकडून 13 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर शऱद पवार यांच्या पक्षाने 7 जागांवर उमेदवार दिले आहेत. शरद पवार यांचा 3 जागांवर उमेदवाराची चाचपणी सुरु आहे, त्यासाठी इच्छूकांच्या नावाचा विचार कऱण्यात येत आहे. काँग्रेसकडून 4 जागांसाठी चाचपणी सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) आतापर्यंत सात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. जागावाटपाला त्यांच्या पारड्यात दहा जागा मिळाल्या आहेत. माढा, सातारा आणि रावेर मतदारसंघात पवारांकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ-
माढ्यातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार यांना मिळाली आहे. शरद पवार यांच्याकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव पवारांकडून सर्वात आघाडीवर आहे. मोहिते पाटील उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत, ते लवकरच तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा आहे. दोन दिवसांत याबाबतचा निर्णय होणार आहे. मोहिते पाटील याआधी शरद पवार यांच्यासोबतच होते, त्यामुळे घरवापसी झाल्यास त्यांना उमेदवारी मिळू शकते.
मोहिते पाटील यांच्याशिवाय अनिकेत देशमुख आणि अभयसिंह जगताप यांची नावेही चर्चेत आहेत. अनिकेत देशमुख यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. माढ्यात शरद पवार काय निर्णय घेतात, हे काही दिवसांत स्पष्ट होईल.
सातारा लोकसभा मतदारसंघ –
विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला, त्यामुळे शरद पवार यांच्याकडून साताऱ्यात उमेदराची चाचपणी सुरु आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, साताऱ्यासाठी शरद पवार यांच्याकडून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काही दिवसांत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊ शकते.
रावेर लोकसभा मतदारसंघ –
एकनाथ खडसे यांनी ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्याकडून खडसेंना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरु होत्या. पण खडसेंनी नकार दिला. त्यामुळे शरद पवारांकडून इच्छूक उमेदवारांची चाचपणी कऱण्यात येत आहे. रवींद्र पाटील श्रीराम पाटील यांची नावं आघाडीवर आहे. लवकरच शरद पवार यांच्याकडून अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. भाजपने रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. खडसेंच्या विरोधात पवार कुणाला उमेदवारी देणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
काँग्रेसकडून चार मतदारसंघात चाचपणी करण्यात येत आहे. यामध्ये धुळे, जालना,मुंबई-उत्तर आणि मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघाचा समावेश आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघ –
धुळे मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. भाजपकडून लागोपाठ तिसऱ्यांदा धुळे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी द्यायची, याबाबत काँग्रेस नेत्यांकडून उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. धुळे लोकसभा मतदार संघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसतर्फे आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने काँग्रेसची पंचाईत झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांचे नाव पुढे आले आहे. त्याशिवाय काँग्रेस पक्षाकडे धुळ्याचे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर आणि नाशिकचे जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे या दोघांची इच्छुक म्हणून नावे घेतली जात होती.
जालना लोकसभा मतदारसंघ –
भाजपने जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सलग पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी होणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्यासमोर सहाव्या वेळी उमेदवार कोण उतरवायचा याची चाचपणी काँग्रेसमध्ये सुरु आहे. काँग्रेसकडून कल्याण काळे यांच्या नावाची चर्चा आहे.
मुंबई-उत्तर लोकसभा मतदारसंघ –
भाजपने मुंबई-उत्तर मतदारसंघात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना मैदानात उतरवले आहे. जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला आहे. काँग्रेसकडून उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. 2019 च्या निवडणुकीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा गोपाळ शेट्टींनी चार लाख मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास संजय निरुपम इच्छूक होते, पण त्यांची हाकलपट्टी कऱण्यात आली आहे. मुंबई-उत्तर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून चाचपणी सुरु आहे.
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ –
मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात काँग्रेसकडून चाचपणी करण्यात येत आहे. या जागेसाठी नसीम खान, राज बब्बर आणि स्वरा भास्कर यांची नावं चर्चेत आहेत. काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार, हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. दुसरीकडे महायुतीकडूनही या जागेवर अद्याप उमेदवार जाहीर कऱण्यात आला नाही. एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये या जागेवर तिढा आहे.