महाविकास आघाडी सर्वाधिक जागा महाराष्ट्रात जिंकणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांनी शुक्रवारी केला. भाजपच्या आदेशाने काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठविण्यात आली असली तरी जनता आम्हाला मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी चेन्निथला नागपूरला आले होते. तत्पूर्वी त्यांनी आज नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘आमच्याकडे कार्यकर्त्यांना चहा पाजायला पैसे नाहीत. तरीही जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. ते आम्हाला मदत करीत असून आमच्या उमेदवारांना जिंकूनसुद्धा आणणार आहेत. महाराष्ट्रातून महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा जिंकण्याचा आम्ही निर्धार केला आहे.’’
‘‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रेत’ जनतेला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. विकास ठाकरे हे आमचे सर्वात चांगले आणि जिंकणारे उमेदवार आहेत,’’ असेही चेन्निथला म्हणाले. महाविकास आघाडी एकत्रितपणे काम करत असताना जागा काही जागा एकमेकांसाठी सोडाव्या लागतात. आमचे उमेदवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी आणि देशाला वाचवण्यासाठी प्रत्येक उमेदवार ‘इंडिया’ आघाडीचा आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
सांगलीचा विषय आज-उद्या सुटणार आहे. तीन पक्षांची आघाडी आहे. सर्वानुमते निर्णय झाल्यानंतर तो उमेदवार ‘इंडिया’ आघाडीचा असतो. हा काही गंभीर विषय नाही. उद्यापर्यंत सांगलीचा तिढा मार्गी लागलेला दिसेल.
– चेन्निथला, प्रदेश प्रभारी, काँग्रेस