कोथरूड ‘मिसिंग लिंक’ची गती अन् ठिकाणेच मिसिंग श्रेयवादाची लढाई मात्र सुसाट; गंभीर प्रश्नी स्थानिक आमदार मात्र चिडीचूप

0

कोथरुड मतदारसंघातील मिसिंग लिंक पूर्ण करुन वाहतूककोंडी मुक्त कोथरुड करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील आग्रही असून मिसिंग लिंक जुळवण्यासाठी महापालिका आयुक्त स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत असतानाही ढीम्म प्रशासन आणि चुकीची माहिती देणाऱ्या टीममुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघात असलेल्या सर्वच मिसिंग लिंक बाबत गती आणि ठिकाणे मिसिंग होत असताना श्रेय वादाची लढाई मात्र जोरात सुरू आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री स्वतः व्यक्तिगत लक्ष घालून याबाबत कायम आग्रही भूमिका घेत करत असलेल्या पाठपुराव्यामुळे मिसिंग लिंकसाठी जमीन अधिग्रहण तथा इतर अडचणी सोडवण्यास गती मिळाली आहे; परंतु जखम डोक्याला मलम कोपराला या उक्तीप्रमाणे मुख्य समस्यांना बाजूला सारून छोटे छोटे(रजपूत वीट भट्टी व एकलव्य कॉलेज) रस्तेच प्रत्यक्षात सुरू होत असल्याने याचा फायदा नक्की किती होईल हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. चांदणी चौक भुसारी कॉलनी या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील स्थानिक आमदार आग्रही असताना खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सलग चार वेळा विजयी झालेल्या आमदारांकडून मात्र याबाबत कोणतीही हालचाल केली जात नाही.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचा अन् दुचाकीस्वरांसाठी वरदान ठरणारा एरंडवणे येथील रजपूत वीटभट्टी परिसरातील जमीन अधिग्रहित करून; रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरीसुद्धा विकास आराखड्यातील म्हात्रे पुलाखालून लोक वस्ती नसलेल्या भागातील रस्त्याबाबत मात्र कोणतीही हालचाल होत नाही. सुतारवाडी भागातील रस्ता रुंदीकरणासाठी जमीन हस्तांतरण पूर्ण झाले असले तरीसुद्धा पुणे महापालिकेच्या वतीने प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात अत्यंत मंद गतीने सुरू करण्यात आली आहे. बाणेर मधील ननवरे चौक ते पॅन कार्ड रेखांकन महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पूर्ण झाले त्यानंतर प्रत्यक्षात जागेवर काम सुरू करण्यासाठी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि भाजपा दोन्ही पक्षांची श्रेयवादाची लढाई सुरू आहे आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

कोथरुडमधील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील एकलव्य कॉलेज येथील विकास आराखड्यातील रस्त्यासाठी २५०० स्क्वेअर फूट जागा महापालिकेकडे हस्तांतरित झाली परंतु प्रत्यक्षात रिकाम्या जागा हस्तांतरित करताना सुद्धा कमीच रुंदी असल्याने नवी समस्या सुरू होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने या रस्त्याच्या अधिकाराबाबत स्वर्गीय गिरीश बापट यांच्या खासदारकीच्या काळापासून आश्वासन देण्यात आली होती. त्यानंतर असंख्य बैठका घेऊन प्रत्येक नगरसेवकांनी या कामाचे श्रेय घेण्यासाठी जोरदार जाहिरात बाजी केली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्तिगत या विषयांमध्ये लक्ष घालून अधिग्रहणाचे काम केले असे सांगितले असले तरीसुद्धा स्थानिक नगरसेवकांमध्ये श्रेयवादाचा सुप्त संघर्ष जाणवत आहे. गणेशोत्सवाच्या अगोदर या जागेचे अधिग्रहण झालेले असतानाही सुद्धा महापालिकेकडून गेली महिनाभर या रस्त्याचे काम सुरू आहे. देवीला नैवेद्य अर्पण करावा त्याप्रमाणे रोज किरकोळ प्रगती करत सदर रस्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीमुक्त कोथरुडसाठी या रस्त्याचा वापर होऊन ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश कधी येईल हा मोठा प्रश्न आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

कोथरुड मतदारसंघ वाहतूककोंडी मुक्तीच्या दिशेने जलदगतीने जाण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे बहुतांशी मिसिंग लिंकच्या कामाने गती मिळवली असली तरी सुद्धा प्रत्यक्षात वाहतूक कोंडीतून मुक्त कोथरूड करण्यासाठी ज्या भागातील रस्त्यांची गरज आहे त्या भागाकडे दस्तूर खुद्द चंद्रकांत दादांचेच लक्ष जाऊ नये यासाठी काही मंडळी काम करत आहेत की काय अशी शंका निर्माण झाली आहे. कोथरूड मधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या सिटी प्राईड ते वनदेवी, कर्वे पुतळा ते मयूर कॉलनी रस्ता, आत्रेय सोसायटी व्हाया सुतार दवाखाना ते कमिन्स कंपनी, बालेवाडी ते पौड फाटा, आकाश नगर वारजे ते आशिष गार्डन चौक या प्रमुख मिसिंग लिंक बाबत साधी चर्चाही होत नाही ही खेदाची बाब आहे. पुणे महापालिकेत कोथरूड भागाचा समावेश झाल्यापासून अन कोथरूड विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबत लक्ष घातल्यामुळे मतदारसंघातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. मात्र मुख्य रस्त्यांबाबत निर्णय झाल्याशिवाय याचा उपयोग होणार नाही. कोथरुड मतदारसंघातील बाणेर भागातील ननवरे चौक ते पॅन कार्ड व एकलव्य कॅालेज मिसिंग लिंकचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर काहीही साथ दिलासा मिळेल मात्र वाहतूक कोंडी मुक्त कोथरूड हे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वप्न पूर्णत्वास येण्यासाठी बरेच काम करण्याची गरज आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

बाणेर येथे अनेक वर्षांपासून बाणेर येथे रखडलेल्या ननवरे चौक ते पॅन कार्ड क्लब रस्त्याच्या कामाला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत सुरुवात झाल्याचे सांगत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच हे काम सुरू केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) माजी नगरसेवकांनी देखील तेथूनच या कामाला सुरुवात केली. या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सरसावले असून, त्यांनी आपआपल्या परीने या कामाला सुरुवात केली आहे. मात्र प्रत्यक्षात प्रशासनाकडून या कामाची अद्याप वर्क ऑर्डर निघाली नाही. राज्य सरकारने ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांसाठी सुमारे दीडशे कोटीहून अधिक रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्याचे भाजपच्या पदाधिकारी सांगतात तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार ८ जुलै रोजी महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत याबाबत चर्चा झाली. त्यानंतर १२ जुलै रोजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली. या पाठपुराव्यानंतर अखेर ननवरे चौकातील प्रलंबित रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. त्यातच हे काम सुरू करण्यासाठी महापालिकेला निवेदन दिल्याचे मनसे पदाधिकारी सांगत आहेत. कोंबडा कुणाचा आरवल यापेक्षा शेवटी पहाट झाली हे महत्त्वाचं! असे म्हणून सर्वसामान्य पुणेकर मात्र सुटकेचा निश्वास टाकणार हे मात्र नक्की!