आयपीएल सामन्यात जशी मॅच फिक्सिंग करून सामने जिंकले जातात. तशीच मॅच फिक्सिंग निवडणुकीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. अंपायर मोदी यांनी निवडले आहेत आणि आमच्या दोन खेळाडूंना जेलमध्येही टाकण्यात आले आहे. त्यामुळे 400 पारचा नारा ईव्हिएम आणि मॅच फिक्सिंगशिवाय शक्य नाही. पण हे 180 चा टप्पाही पार करणार नाहीत, असे भाकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी दिल्लीतील रामलीला मैदानात इंडिया आघाडीच्या महारॅलीच्या सभेत बोलत होते. यावेळी सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली. मॅच फिक्सिंग करून भाजपला निवडणुका जिंकायच्या आहेत आणि संविधान बदलायचे आहे. ज्या दिवशी हे संविधान संपेल त्या दिवशी हिंदुस्तान वाचणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
पोलीस, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स या सगळ्या यंत्रणांना मिळून देश चालवला जातोय. तुम्ही मीडियाला दाबु शकता, पण हिंदुस्तानाची आवाज तुम्ही दाबु शकत नाही. संविधानाला वाचवण्याचीही हि लढाई आहे. त्यांनी संविधान बदलले तर हा देश पेटणार आहे. ही निवडणूक मतांसाठी नसून संविधानाच्या रक्षणासाठी असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.
दरम्यान काँग्रेस पक्षाची सर्व खाती बंद करण्यात आली आहेत. नेत्यांना पैशाच्या धमक्या दिल्या जातात, सरकार पाडले जाते, नेत्यांना तुरुंगात टाकले जाते. हे मॅच फिक्सिंग नरेंद्र मोदीच करत आहेत असे नाही. मॅच फिक्सिंग नरेंद्र मोदी आणि तीन-चार अब्जाधीश मिळून करत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी मोदींवर केला आहे.
ज्या दिवशी याची मॅच फिक्सिंग यशस्वी होईल. त्या दिवशी आपलं संविधान संपेल. हा देश नाही वाचणार नाही. ही निवडणूक सामान्य निवडणूक नाही आहे. हिंदुस्थानाला वाचवणारी आणि संविधानाला वाचवणारी निवडणूक असल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत.